रुग्णांची लूट थांबणार, रुग्णवाहिकांचे दर सरकार ठरवणार; खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:42 AM2020-07-02T01:42:08+5:302020-07-02T07:04:54+5:30
जादा दर आकारणीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यंत्रणा तयार करतील. या रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असेल
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधीत रुग्णांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका तसेच खासगी वाहने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अधिग्रहीत केलेले रुग्ण वाहक वाहन जास्त गंभीर नसलेल्या रुग्णांसाठी वापरण्यात येईल. तसेच दरही ठरवून देण्यात येणार आहेत.
राज्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने रुग्णवाहिकांची आवश्यकता भासत आहे. त्यासाठी खासगी रुग्णालये, स्वयंसेवी संस्था यांच्याकडील रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येतील. गरज भासली तर खासगी वाहन पुरवठादारांची वाहने देखील रुग्ण वाहक वाहन म्हणून वापर करण्याचा निर्णय झाला आहे. रुग्णवाहिका अधिग्रहीत करण्याची प्रक्रिया जिल्हाधिकारी (महापालिका क्षेत्र वगळता ) आणि महापालिका आयुक्त (महापालिका क्षेत्रात) राबवतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
तक्रारींचे निवारण केले जाईल
जादा दर आकारणीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यंत्रणा तयार करतील. या रुग्णवाहिका २४ तास उपलब्ध असेल. रुग्णवाहिकेत स्मार्ट फोन, इंटरनेट सुविधा असेल. टोल फ्री १०८ रुग्णवाहिकेचे अॅप त्यात असेल. ते या क्रमांकाच्या प्रणालीशी जोडले जाईल. रुग्णवाहिकेला संपर्कासाठी रुग्णांना १०८ क्रमांक किंवा स्थानिक प्रशासनाने सुरू केलेल्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल.
आरटीओ ठरवतील दर
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या दरानुसार भाडे तत्त्वावरील वाहनांचे दर निश्चित केले जातील. त्यासाठी वाहनाचे भाडे, प्रत्यक्ष प्रवासाचे अंतर (किलोमीटर्स) याचा विचार करण्यात यावा, असे या शासन निर्णयात म्हटले आहे. जेथे वाहन चालक उपलब्ध नसेल तेथे रुग्णवाहिका मासिक भाडेतत्त्वावर ताब्यात घेण्यात येतील. त्यांना चालक उपलब्ध केले जातील.