रुग्णच नाकारतात भारतीय स्टेण्ट
By admin | Published: May 24, 2015 01:36 AM2015-05-24T01:36:48+5:302015-05-24T01:36:48+5:30
जीवनशैलीमुळे होणाऱ्या प्रमुख तीन आजारांमध्ये हृदयरोगाचा समावेश झालेला आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपूर्वीपर्यंत श्रीमंतांचा समजला जाणारा ‘हृदयविकार’ आता सर्रास कोणत्याही आर्थिक गटातल्या,
जीवनशैलीमुळे होणाऱ्या प्रमुख तीन आजारांमध्ये हृदयरोगाचा समावेश झालेला आहे. गेल्या १० ते १२ वर्षांपूर्वीपर्यंत श्रीमंतांचा समजला जाणारा ‘हृदयविकार’ आता सर्रास कोणत्याही आर्थिक गटातल्या, वयोगटातल्या व्यक्तीला होतो. हृदयविकारात ब्लॉक झालेल्या धमन्या मोकळ्या करण्यासाठी स्टेण्ट वापरण्यात येतो. रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच स्टेण्टच्या किंमतीही वाढत आहेत. यासंदर्भात तक्रारी आल्यावर तपास करून महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नॅशनल फार्मास्युटिकल अथॉरिटीला (एनपीपीए) अहवाल धाडला आहे. त्यात स्टेण्टला जीवनावश्यक औषधांच्या (५०४) यादीत समाविष्ट करा, अशी मागणी करण्यात आलेली आहे. याच पार्श्वभूमीवर हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुरासे यांच्याकडून हृदयविकार, स्टेण्ट म्हणजे काय? आणि स्टेण्टचा व्यापार कसा चालतो याविषयी केलेली बातचीत...
हृदयविकार म्हणजे काय?
हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदयविकार उद्भवतो. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन प्रमुख धमन्या असतात. समोरच्या धमनीला सेंट्रल, उजव्या बाजूच्या धमनीला वेस्टर्न आणि डाव्या बाजूच्या धमनीला हार्बर लाइन असे म्हटले जाते. या धमन्यांमध्ये रक्त गोठून ब्लॉकेज निर्माण झाल्यास हृदयाचा रक्तपुरवठा काही प्रमाणात खंडित होतो. यालाच हृदयविकार असे म्हटले जाते. ब्लॉकेजचे प्रमाण वाढल्यास त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
हृदयविकार होण्याची कारणे?
अनुवंशिकता, जीवनशैली आणि रक्तातील घटकांमधले दोष ही हृदयविकार होण्याची प्रमुख तीन कारणे आहेत. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे अतिसेवन, मद्यप्राशन, अवेळी झोपणे, अवेळी खाणे, जंक फूड ही जीवनशैलीमुळे हृदयविकार होण्याची प्रमुख कारणे आहेत. तर रक्तातील घटकांमध्ये असलेल्या दोषांमुळेही हृदयविकार उद्भवू शकतो.
हृदयविकार वाढतो आहे का?
गेल्या १० ते १२ वर्षांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण वाढताना दिसत आहे. वातावरणापासून जीवनशैलीमध्ये होत गेलेल्या बदलांमुळे हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ होते आहे. जीवनशैलीत बदल करून रोज व्यायाम केला, सकस आहार घेतला, झोपेच्या वेळा सांभाळल्या तर हृदयविकार टाळता येऊ शकतो.
अॅन्जिओप्लास्टी म्हणजे काय?
हृदयविकार झाल्यावर हृदयाला नियमित रक्तपुरवठा होत नाही. यावर उपचार करण्यासाठी आधी अॅन्जिओग्राफी करून धमण्यांमध्ये किती प्रमाणात ब्लॉकेज आहेत, याचे निदान केले जाते. यानंतर धमन्यातील ब्लॉकेज काढून धमनी मोकळी करण्यासाठी अॅन्जिओप्लास्टीची प्रक्रिया केली जाते. त्याआधी कॅथेटर, फुगा, तार या साधनांचा वापर करून धमनीत स्टेण्ट सोडला जातो. स्टेण्टमुळे धमनी मोकळी होऊन हृदयाला होणारा रक्तपुरवठा होण्यास मदत होते. स्टेण्ट हे तीन प्रकारचे असतात.
स्टेण्टला जीवनावश्यक औषध म्हणून जाहीर करावे याविषयी तुमचे मत काय?
फक्त स्टेण्टच नाही, तर हृदयविकारावर उपचार करण्यासाठी वापरण्यात येणारे कॅथेटर, पेसमेकर, बलून, विशिष्ट तारा या सर्वांचाच समावेश जीवनावश्यक औषधांच्या यादीत केला पाहिजे. स्टेण्ट म्हणजे विज्ञानाचे सर्वांत मोठे देणे आहे. गेल्या काही वर्षांत स्टेण्टच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. एमआरपीच्या बरोबरीनेच नफ्याचा टक्का वाढत असल्याने स्टेण्टच्या किमती या लाखाच्या घरात पोहोचल्या आहेत. पण स्टेण्टचा समावेश जीवनावश्यक औषधांच्या यादीत करण्यात आला, तर त्याच्या मूळ किमतीवर नियंत्रण येईल. याचबरोबरीने नफ्याच्या टक्केवारीवरही नियंत्रण येईल. याचा नक्कीच रुग्णांना फायदा होणार आहे. परदेशी बनावटीच्या स्टेण्टच्या किमतीही कमी होतील.
भारतीय बनावटीच्या आणि परदेशी बनावटीच्या स्टेण्टमध्ये काही फरक आहे का?
अजिबातच नाही. भारतातही प्रगत तंत्रज्ञान आहे, संशोधन केले जाते. यामुळे भारतीय बनावटीचे स्टेण्ट आणि परदेशी बनावटीच्या स्टेण्टमध्ये फरक नसतो. भारतीय कंपन्याही मोठ्या प्रमाणात स्टेण्ट तयार करतात. परदेशात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करूनच हे स्टेण्ट बनवले जातात.
परदेशी स्टेण्टची आयात मोठ्या प्रमाणावर होते, कारण...
भारतातील रुग्णच याचे प्रमुख कारण आहे. परदेशातील स्टेण्टच्या तुलनेत भारतीय स्टेण्टची किंमत कमी आहे. परंतु, रुग्णच भारतीय स्टेण्टला नाही म्हणतात. त्यांचा असा समज असतो की, यूएस एफडीए मान्यताप्राप्त स्टेण्ट वापरला की तो चांगला. असे बिलकूलच नाही. यामुळे रुग्णांची मानसिकता बदलण्यासाठी जनजागृती होण्याची आवश्यकता आहे. डॉक्टरांनीही रुग्णांना
स्टेण्टविषयी समजावून सांगितले पाहिजे. देशात १७-१८ वर्षांपूर्वी तयार केलेल्या स्टेण्ट कंपनीचे आजही स्टेण्ट वापरले जातात. त्या स्टेण्टमध्ये काहीच समस्या उद्भवलेली नाही. भारतीय बनावटीचे स्टेण्ट वापरल्यास रुग्णांच्या उपचारांचा खर्च नक्की कमी होऊ शकतो. परदेशी स्टेण्ट हे रुग्णांच्या आग्रहाखातर आयात केले जातात. भारतीय बनावटीचा स्टेण्ट आणि परदेशी बनावटीच्या स्टेण्टमध्ये फाईननेसमध्ये किंचित फरक असू शकतो. असे असले तरी त्याची कार्यक्षमता सारखीच असते, यामुळे काहीच फरक पडत नाही.
परदेशी स्टेण्टची किंमत जास्त का असते?
सध्या हा एक मोठा व्यवसाय बनला आहे. या व्यवसायात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जात असून तितकाच नफा मिळवला जात आहे. पैसा रोलिंग असल्याने सध्या स्टेण्टच्या किमतीवर सर्वांचे लक्ष गेले. परदेशी बनावटीच्या स्टेण्टच्या किमती मुळात जास्त असण्यामागचे एक प्रमुख कारण म्हणजे संशोधनासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जाणारा पैसा. एखादे नवीन औषध तयार करून आणण्यासाठी आधी क्लिनिकल ट्रायल घेतल्या जातात. स्टेण्ट तयार करण्यासाठी, स्टेण्ट अद्ययावत करण्यासाठी क्लिनिकल ट्रायल घ्याव्या लागतात. याचे प्रयोग आधी प्राण्यांवर केले जातात. यानंतर माणसांवर प्रयोग केले जातात. या संशोधनासाठी हजार व्यक्तींवर ट्रायल घेतली जाते. या वेळी सगळे उपचार मोफत केले जातात. या ठिकाणी मिलियन डॉलरची गुंतवणूक होते. यामुळे स्टेण्टच्या किमतीत वाढ होते.
स्टेण्टची किंमत कशी वाढते?
कंपनीत तयार झालेला स्टेण्ट रुग्णापर्यंत पोहोचेपर्यंत मध्ये दहा गोष्टी असतात. यामुळे प्रत्येक पायरीवर नफा अधिक केला जात असतो. त्यामुळेच स्टेण्ट रुग्णापर्यंत पोहोचेपर्यंत त्याची किंमत वाढलेली असते. संशोधनाचे १० ते १५ टक्के अधिक किमतीत लावले जातात. परदेशातून आयात केलेल्या स्टेण्टवर आयात कर लागतो. वितरकाचा नफा यात वाढवला जातो. स्टेण्टसाठी काही कर लावले जातात. रुग्णालयाचाही यात समावेश असतो. अशा प्रकारे प्रत्येक पायरीवर वाढणाऱ्या नफ्याने स्टेण्टच्या मूळ किमतीपेक्षा ती तिपटीपेक्षा अधिक होऊन लाखाच्या घरात जाते. आधी राज्यात स्टेण्टवर १२ टक्के व्हॅट लावला जायचा. अनेक प्रयत्न करून तो आता ५ टक्क्यांवर आणला आहे. प्रत्यक्षात व्हॅट लावलाच नाही पाहिजे, तरीही तो आता कमी झाला आहे. गुजरात, केरळ, तामिळनाडू या राज्यांत स्टेण्टवर व्हॅट लावला जात नाही. सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तरी स्टेण्टची किंमत ४५ ते ५० हजार इतकी ठेवता येऊ शकते. पण सध्या हेच स्टेण्ट दीड ते पावणेदोन लाख रुपये किमतीने विकले जात आहेत.
नफा मिळवण्यासाठी परदेशी कंपन्या काही युक्त्या वापरतात का?
स्टेण्ट तयार करणाऱ्या कंपन्या अनेकदा फसवणूक करतात. अनेकदा स्टेण्टची किंमत जास्त असल्यामुळे विकत घेण्यास रुग्णालये नकार देतात. यामुळे वितरक कंपन्यांवर स्टेण्टची किंमत कमी करण्यासाठी दबाव आणतो. यामुळे या कंपन्या त्या वेळी स्टेण्ट बल्कमध्ये देताना किंमत कमी करतो. यानंतर पुढच्या काही महिन्यांत अपग्रेडेड स्टेण्ट आणल्याचे सांगितले जाते. यात अनेकदा फारसा बदल केलेला नसतो. त्याच पद्धतीने औषध ठेवलेले असते. तरीही त्याचे पॅकिंग, लेबलिंग बदलले जाते. पण, त्याची किंमत वाढवलेली असते. हे स्टेण्ट घेतल्यानंतर एक दीड वर्षात जास्त फरक नसल्याचे जाणवते. तोपर्यंत नवीन स्टेण्ट आलेला असतो. सध्या बाजारात १०० हून अधिक वेगवेगळे स्टेण्ट आहेत. यामुळे कंपन्यांना चांगलाच नफा मिळत असतो.
किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी उपाय...
स्टेण्टचा जीवनावश्यक औषधामध्ये समावेश केल्यास त्याची मूळ किंमत ठरवली जाईल. स्टेण्टसाठी देश पातळीवर एका समितीची स्थापना केली पाहिजे. या समितीतर्फे स्टेण्टचे वर्गीकरण करून त्याच्या किमती ठरवल्या जातील. त्यामुळे देशातील कुठल्याही भागात एका वर्गातील स्टेण्टची किंमत सारखी राहील. एका कंपनीला त्यांचे अद्ययावत स्टेण्ट विकण्याचीच फक्त परवानगी दिली पाहिजे. आधीच्या स्टेण्ट विकण्याची परवानगी रद्द करायला पाहिजे.
नाही तर जुने स्टेण्टही विकले जातात. स्टेण्ट संदर्भात एखादी कंपनी फसवणूक करताना आढळल्यास विमा कंपन्यांनी त्यांना काळ्या यादीत टाकले पाहिजे. रुग्णालयाने स्टेण्टमध्ये जास्तीत जास्त १० ते १५ टक्के नफा ठेवला पाहिजे. त्यामुळे स्टेण्टची किंमत कमी होईल. सद्य:स्थितीला रुग्णालये ५० ते ६० हजार प्रत्येक स्टेण्टमागे कमवत आहेत. याला आळा घालण्यासाठी सर्व रुग्णालयांनी एथिक्स कमिटीची स्थापना करायला हवी. कमिटीमध्ये प्रशासनातील व्यक्तींचा समावेश असावा. प्रत्येक रुग्णालयाने रुग्णांचे मार्गदर्शन केले पाहिजे. रुग्णाची आर्थिक स्थिती जाणून घेऊन त्यानुसार त्यांना दाखल करून घेतले पाहिजे.
डॉक्टरांनी काय केले पाहिजे?
डॉक्टरांचा यात मोठा वाटा आहे. ९० टक्के डॉक्टर हे चांगले असल्यामुळे ते चांगल्या पद्धतीने रुग्णांवर उपचार करतात. रुग्णांना त्यांच्या उपचारांविषयी माहिती दिली पाहिजे. त्यांचा येणारा खर्च कशाचा आहे हे रुग्णांना समजावून सांगितले पाहिजे. भारतीय स्टेण्ट चांगले आहेत, याविषयी माहिती दिली पाहिजे.
मेडिकल टूरिझमविषयी काय सांगाल?
भारतीय हे हुशार, कष्टाळू असतात. डॉक्टरांचा अनुभव जास्त असतो. चेन्नई, मुंबईसारख्या शहरांत चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध आहेत. परदेशाच्या तुलनेत भारतातील उपचार स्वस्त आहेत. त्यामुळे परदेशी लोकांना कमी पैशात चांगले उपचार मिळतात. त्यामुळे अनेक परदेशी नागरिक उपचार घेण्यासाठी भारतात येतात. परदेशी चलनाच्या तुलनेत भारतीय चलन कमी आहे. यामुळे त्यांना आरोग्यसेवा स्वस्त वाटते. त्यामुळे हे लोक चेन्नई, मुुंबईसारख्या शहरात उपचार घेतात.