मुंबई : आपण करत असलेली रुग्णसेवा अत्युच्च पातळीवर नेण्यासाठी आणि आपल्या रुग्णालयाची व वैद्यकीय महाविद्यालयाची अधिक चांगली ओळख निर्माण होण्यासाठी रुग्णसेवा हाच कामाचा व व्यवसायाचा केंद्रबिंदू आहे, हे आपण सदैव लक्षात ठेवून अधिकाधिक समर्पित भावनेने रुग्णसेवा करायला हवी. रुग्णसेवेसोबतच वैद्यकीय संशोधनाकडेदेखील जाणीवपूर्वक लक्ष देऊन संशोधकीय दृष्टीकोन विकसित करायला हवा, ज्यामुळे रुग्णांना परिणामकारक औषधोपचार मिळू शकतील. तसेच संशोधकीय दृष्टीकोन विकसित करण्यासाठी सातत्याने ग्रंथालयांचा व ऑनलाईन वाचनालयांचा अधिकाधिक वापरदेखील करायला हवा, असे मार्गदर्शन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांनी केले.
नुकत्याच झालेल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सहाव्या स्थापनादिनी उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या कोविड प्रतिबंधविषयक कृती समितीचे अध्यक्ष डॉ. संजय ओक हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) देविदास क्षीरसागर, वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. रमेश भारमल आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते हे विशेषत्वाने उपस्थित होते.
या कार्यक्रमादरम्यान गेल्या शैक्षणिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रे देऊन कौतुक करण्यात आले. या कौतुक सोहळ्यामध्ये प्रामुख्याने राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध शैक्षणिक, सह-शैक्षणिक, कला, क्रीडा इत्यादी स्पर्धांमध्ये वा कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. त्याचबरोबर गेल्या शैक्षणिक वर्षादरम्यान उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अध्यापक शिक्षकांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. कोविडच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम साधेपणाने आयोजित करण्यात आला होता, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहिते यांनी दिली.