मुंबई : राज्यभरातील ४ हजार ५०० निवासी डॉक्टरांनी पाचव्या दिवशी संप कायम सुरू ठेवल्यामुळे मुंबईसह राज्यभरातील रुग्णसेवा पूवर्वत झाली नसल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले. मात्र शुक्रवारी सायंकाळी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर इंडियन मेडिकल असोसिएशनशी संलग्न राज्यभरातील ४० हजार डॉक्टर्सनी या संपातून माघार घेतल्याने खासगी डॉक्टर कामावर रुजू झाल्याने सामान्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.मुंबई शहर - उपनगरातील केईएम, शीव, जे.जे, नायर, भाभा अशा प्रमुख रुग्णालयांमध्ये बाह्यरुग्ण कक्ष विभाग बंद असल्याने रुग्णसेवा सुरळीत झालेली दिसून आली नाही. याउलट, राज्यभरातून मुंबईत उपचारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांचे डॉक्टरांच्या संपामुळे हाल झाल्याचे दिसून आले. या रुग्णालयांत सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे. त्यामुळे उपचारासाठी आलेल्या रुग्णांचे कमालीचे हाल होत आहेत. जे रुग्ण अगोदरपासून दाखल आहेत, त्यांची वरिष्ठ आणि कायम सेवेतील डॉक्टर काळजी घेत आहेत. परंतु नवीन रुग्णांना दाखल करून घेण्यात खूप अडचणी येत आहेत.केईएम रुग्णालयात शुक्रवारी लहान-मोठ्या अशा एकत्रित ३४ शस्त्रक्रिया पार पडल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी दिली. तर नायर रुग्णालयात लहान - मोठ्या मिळून एकूण २२ शस्त्रक्रिया झाल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी दिली. (प्रतिनिधी)
रुग्णसेवा पूर्ववत नाही
By admin | Published: March 25, 2017 1:47 AM