कोरोनामुळे बोलण्याची क्षमता गमावलेला रुग्ण बोलू लागला; स्पीच थेरपीद्वारे केले उपचार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 02:07 AM2020-10-13T02:07:09+5:302020-10-13T02:07:50+5:30
या स्ट्रोकमुळे रुग्णाच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने त्यांना बोलता येत नव्हते. अशा स्थितीत मुंबई सेंट्रल येथील खासगी रुग्णालयात स्पीच थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहेत
मुंबई : कोरोनामुळे फुप्फुसांवर गंभीर परिणाम होतात, त्याचप्रमाणे आता मेंदूवरही आघात करू लागला आहे. उल्हासनगर येथील ४८ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीला या आजारासह मेंदूचा झटका (ब्रेन स्ट्रोक) आल्याचे समोर आले आहे.
या स्ट्रोकमुळे रुग्णाच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने त्यांना बोलता येत नव्हते. अशा स्थितीत मुंबई सेंट्रल येथील खासगी रुग्णालयात स्पीच थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहेत. या उपचारांमुळे हा रुग्ण कोरोनामुक्त होऊन आता सर्वसामान्य आयुष्य जगू लागला आहे. रमेश (नाव बदललेले) यांना गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. शारीरिक अशक्तपणासुद्धा जाणवत होता. प्रकृती अधिकच बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना मुंबई सेंट्रल रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी ८ ऑगस्ट रोजी कोविड चाचणी अहवालात ते पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले.
विशेष म्हणजे, रुग्णालयात आणले तेव्हा रुग्णाला बोलताही येत नव्हते. एमआयआय चाचणीत मेंदूच्या डाव्या अर्ध्या भागात ब्रेन स्ट्रोक असल्याचे निदान आले. अशा वेळी रुग्णावर स्पीच थेरपीद्वारे उपचार करण्यात आले आहेत. डॉ. प्रशांत मखीजा म्हणाले, मेंदूचा झटका आल्याने रुग्णाला बोलता येत नव्हते. संवाद साधतानाही अडचणी जाणवत होत्या. वैद्यकीय भाषेत याला ‘अप्सिया’ असे म्हणतात. अशा परिस्थितीत रुग्णांवर मेलोडिक इनटोनेशन थेरपी (एमआयटी)द्वारे उपचार करण्याचा निर्णय घेतला. ही थेरपी शब्द व अर्थपूर्ण भाषा सुधारण्यास मदत करते.
स्पीच थेरपिस्ट नूतन कोरगावकर म्हणाले, स्ट्रोकचा झटका आल्याने रुग्णाच्या बोलण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला होता. अशा स्थितीत त्यांच्यावर स्पीच थेरपीद्वारे उपचार केले. संगीत आणि गाण्याबद्दलच्या त्यांच्या प्रेमामुळे कदाचित त्यांची संवाद साधण्याच्या क्षमतेत सुधारणा झाली. आता ते सर्वसामान्यांप्रमाणे बोलू लागले आहेत. रमेश (नाव बदललेले) यांना गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला आणि अंगदुखीचा त्रास जाणवत होता. शारीरिक अशक्तपणासुद्धा जाणवत होता. प्रकृती बिघडू लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना मुंबई सेंट्रल रुग्णालयात दाखल केले.