मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील रुग्णवाढीचा दैनंदिन सरासरी दर ०.०५ टक्के एवढा खाली आला आहे. तर दररोजच्या बाधित रुग्णांचे प्रमाण साडेतीनशेच्या आसपास असते. आता केवळ पाच हजार २०१ सक्रिय रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयांत राखीव १५ हजार खाटा रिकाम्या आहेत. तर केवळ १५ टक्के खाटांवर कोविड रुग्ण उपचार घेत आहेत.
दुसरी लाट आल्यानंतर मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला. एप्रिल-मे महिन्यात दररोजच्या बाधित रुग्णांचा आकडा नऊ ते दहा हजारांवर पोहोचला. त्यामुळे तब्बल ९२ हजार सक्रिय रुग्ण असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला होता. या काळात पालिका व खाजगी रुग्णालयांतील राखीव खाटांची कमतरता भासू लागली. तर ऑक्सिजन खाटांचाही तुटवडा जाणवला. मात्र कडक निर्बंध, वेगाने लसीकरण आणि संसर्ग रोखण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा सकारात्मक परिणाम दिसून येऊ लागला. आता दररोज सरासरी साडेतीनशे बाधित रुग्ण आढळून येत आहेत. तर ९७ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही १४०५ दिवसांवर पोहोचला आहे. यामुळे सध्या २ हजार ७३० कोविड खाटांवरच रुग्ण उपचार घेत आहेत.
अशी आहे सद्य:स्थिती
प्रकार.. उपलब्ध खाटा... दाखल रुग्ण... रिक्त
साधारण खाटा १५३४९ ... १८०३ ..१३५४६
अति दक्षता २२८२... ८२७.... १३५४६
ऑक्सिजन ८७८३ .... ११२४..... ७६५९
व्हेंटिलेटर १२९५ ... ५२७ ..... ७६८