लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा संसर्ग पुन्हा जोर धरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर पालिका व राज्य शासनाची यंत्रणा सतर्क झाली असून सर्व पातळ्यांवर संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्न करीत आहे. दुसरीकडे मागील आठवड्यापासून शहर, उपनगरांत जम्बो कोविड केंद्र अतिदक्षता विभागात रुग्णसंख्या वाढत असल्याचे चित्र आहे.वांद्रे येथील जम्बो कोरोना केंद्राचे अधिष्ठाता डॉ. राजेश ढेरे यांनी सांगितले, मागील दोन दिवसांपासून या केंद्रात मनुष्यबळ वाढावे, यासाठी डॉक्टर अधिकारी आणि परिचारिकांची भरती सुरू आहे. मागील आठवड्यात येथे सरासरी १८० रुग्ण होते. सध्या रुग्णसंख्या ३२० हून अधिक आहे. मागील आठवड्यात आयसीयू कक्षात सरासरी ३० रुग्ण होते, मात्र यात वाढ होऊनही संख्या ४० वर गेली आहे.गोरेगाव, नेस्को कोविड केंद्रात ८८६ खाटा होत्या. यात अतिरिक्त ७६९ खाटांची भर टाकल्याची माहिती केंद्राच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्रे यांनी दिली. मागील आठवड्यात ३२ रुग्ण होते. आता ११४१ आहेत. दैनंदिन रुग्ण दाखल होण्याची संख्या २० ते २२ आहे. मागील आठवड्यात येथे एकही रुग्ण ऑक्सिजनवर नव्हता, सध्या १२ हून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.टास्क फाेर्सचे सदस्य डॉक्टर राहुल पंडित म्हणाले, मागच्या दोन दिवसांत अतिदक्षता विभागात दाखल होण्यासाठी अनेक लोकांनी रुग्णालयात संपर्क केला आहे. नायर रुग्णालयाचे अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. राकेश भदाडे यांनी सांगितले की, अतिदक्षता विभागात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दोनवरून सहावर पोहोचले आहे. मात्र, अजूनही मृत्युदर स्थिरावलेला आहे.
सक्रिय रुग्णांच्या संख्येत ४१ टक्क्यांनी वाढnमागील १० दिवसांत मुंबईतील सक्रिय रुग्णांच्या संख्येत ४१ टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. सध्या १३ हजार १२५ कोरोना खाटांपैकी ३८७९ खाटा आरक्षित आहेत. nयातील १५५४ अतिदक्षता विभागातील खाटा आहेत. पालिका रुग्णालयांमध्ये अतिदक्षता विभागातील ३९ टक्के खाटा आरक्षित आहेत, तर, खासगी रुग्णालयांमध्ये हे प्रमाण ४६ टक्के एवढे आहे. खासगी रुग्णालयांमध्ये ५७५ अतिदक्षता खाटा आरक्षित आहेत.