मुंबई- मुंबई महापालिकेच्या सर्व प्रमुख रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना माहिती आणि मदत पुरवण्यासाठी 'रुग्ण मित्र' सुरू करण्यात आला आहे. यावरुन आता रुग्णांना मोठी मदत मिळणार आहे. आज मंत्री मंगलप्रभात लोढा आणि मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे.
कुटुंबातील एखादी व्यक्ति आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंबावर त्याचा ताण येतो. अशावेळी रुग्णाला योग्य ती वैद्यकीय मदत, कुटुंबातील व्यक्तींना आवश्यक ते सर्व सहकार्य, मार्गदर्शन मिळणे अत्यंत महत्वाचे असते. बृहन्मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून असंख्य रुग्ण उपचारासाठी येतात. आजारपणात रुग्णाला होणारा त्रास तसेच कुटुंबियांना मानसिक तणाव असताना योग्य निर्णय घेण्यास त्यांना मदत मिळणे आवश्यक असते. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी 'रुग्ण मित्र हेल्प डेस्क' सुरु करण्याची संकल्पना मांडली होती. पालकमंत्री लोढा यांच्या सुचनेनुसार २९ ऑगस्ट रोजी मुंबई महापालिकेद्वारे हेल्प डेस्क सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्या अनुषंगाने दिनांक २३ नोव्हेंबर रोजी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते KEM हॉस्पिटलमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यातील प्रथम रुग्ण मित्र हेल्प डेस्क सुरु करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या २५ मुख्य रुग्णालयात २५ डिसेंबरपर्यंत २५ रुग्ण मित्र हेल्प डेस्क सुरु करावेत असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले आहेत.
असा असेल रुग्ण मित्र हेल्प डेस्क
रुग्णालयांच्या प्रमुख द्वरापाशी अथवा नोंदणी कक्षाच्या ठिकाणी हेल्प डेस्कचे कॅबिन स्थापन करण्यात येईल. प्रमुख रुग्णालयात सकाळी ३, दुपारी २ आणि रात्री १ याप्रमाणे तर उपनगरीय रुग्णालयांमध्ये सकाळी २ आणि दुपारी २ या प्रमाणे हेल्प डेस्कसाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल. रुग्णांना, त्यांच्या कुटुंबाला व्यवस्थित मदत करण्यासाठी, वेळप्रसंगी आधार देण्यासाठी नम्र आणि संवाद कौशल्य उत्तम असलेले आणि सॉफ्ट स्किल्स व्यवस्थितरित्या आत्मसात केलेले कर्मचारी नियुक्त करण्यात येतील. या कर्मचाऱ्यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषांवर प्रभुत्व असेल, त्याचबरोबर संगणक हाताळण्याचे सुद्धा त्यांना संपूर्ण ज्ञान असेल. या हेल्प डेस्कवरती दिशादर्शक फलक, संगणक, दूरध्वनी, नोंदणी पुस्तिका आणि सूचना पेटीची व्यवस्था सुद्धा असेल.
रुग्णालय मदत कक्षासंदर्भातील सद्यस्थिती!
KEM रुग्णालयात प्रवेशद्वार क्र. १ आणि ७ येथे २ हेल्प डेस्क सुरु करण्यात आले आहेत. तसेच अधिष्ठाता कार्यालयाच्या शेजारी रुग्ण मदत कक्ष कार्यान्वित करण्यात आला असून, त्याठिकाणी सहायक वैद्यकीय अधिकारी २४ तास उपलब्ध असतील. तसेच नायर रुग्णालयात नोंदणी कक्ष विभागाजवळ हेल्प डेस्क उभारला असून, लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी सुरु करण्यात येईल.
कूपर रुग्णालयात सुद्धा नोंदणी कक्षाच्या प्रवेशद्वाराजवळ हेल्प डेस्क उभारण्याचे काम सुरु आहे. त्याचबरोबर के. बी. भाभा रुग्णालय वांद्रे (प), वि. न. देसाई रुग्णालय सांताक्रूझ (पु), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कांदिवली (प), खान बहादूर भाभा रुग्णालय कुर्ला (प), पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय गोवंडी, राजावाडी रुग्णालय घाटकोपर या उपनगरातील प्रमुख ६ रुग्णालयांमध्ये देखील रुग्ण मित्र हेल्प डेस्क उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. मुंबई महापालिकेच्या २५ मुख्य रुग्णालयात २५ डिसेंबरपर्यंत २५ रुग्ण मित्र हेल्प डेस्क सुरु करावेत असे निर्देश पालकमंत्री लोढा यांनी दिले आहेत.