‘रुग्णांचे हास्य हीच प्रेरणा’

By Admin | Published: February 14, 2016 02:48 AM2016-02-14T02:48:42+5:302016-02-14T02:48:42+5:30

अंधूक दिसणारे जग सुस्पष्ट दिसण्याची दृष्टी देणाऱ्या गुरू-शिष्यांच्या जोडीने नेत्र शस्त्रक्रियांचा २ लाखांचा टप्पा पार करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे जे.जे. रुग्णालय आणि नेत्रविकाराच्या

'Patients' humor inspiration' | ‘रुग्णांचे हास्य हीच प्रेरणा’

‘रुग्णांचे हास्य हीच प्रेरणा’

googlenewsNext

- डॉ. तात्याराव लहाने आणि डॉ. रागिणी पारेख यांच्याशी खास संवाद

अंधूक दिसणारे जग सुस्पष्ट दिसण्याची दृष्टी देणाऱ्या गुरू-शिष्यांच्या जोडीने नेत्र शस्त्रक्रियांचा २ लाखांचा टप्पा पार करून एक विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यामुळे जे.जे. रुग्णालय आणि नेत्रविकाराच्या शस्त्रक्रिया हे समीकरणच बनले. जे.जे. रुग्णालय म्हटले की, डोळ्यांसमोर येतात, ज्येष्ठ नेत्रशल्य चिकित्सक डॉ. तात्याराव लहाने आणि नेत्रशल्य चिकित्सक डॉ. रागिणी पारेख. रुग्णांची सेवा हाच धर्म त्यांनी मानला. ‘रुग्णांचे हास्य हीच प्रेरणा’ मानणाऱ्या या गुरू-शिष्याच्या यशाचे रहस्य ‘लोकमत’ने ‘कॉफी टेबल’च्या माध्यमातून जाणून घेतले.

सध्या जगभरात डोळ्यांची सर्वांत मोठी समस्या काय आहे?
डॉ. लहाने : जगभरात डोळ्यांच्या आजाराचे स्वरूप पाहता मोतीबिंदू, काचबिंदू आणि मधुमेहामुळे होणारा रेटिनोपथी असा क्रम आहे. पण, भारतातील स्थिती तशी नाही. आपल्याकडे मोतीबिंदू, रेटिनोपथी आणि काचबिंदू असा क्रम आहे. सध्या आपला देश मधुमेहाची राजधानी बनत चालली आहे. त्यामुळे पुढच्या काळात डोळ्यांच्या आजारात वाढ होणार आहे. त्याचबरोबर म्हातारपणी येणाऱ्या अंधत्वाची समस्या गंभीर स्वरूप धारण करीत आहे.
डोळ्यांचे आजार वाढण्याची कारणे?
डॉ. लहाने : बदलती जीवनशैली हे डोळ्यांचे आजार वाढण्याचे, अंधत्व येण्याचे प्रमुख कारण बनत आहे. आपल्या खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाले आहेत. पूर्वी फळे, हिरव्या पालेभाज्या, ताजे अन्न घेतले जायचे. पण, आता जंक फूडला पसंती आहे. त्यामुळे अन्नातून प्रथिने मिळत नाहीत. बारीक होण्यासाठी गोळ्या घेतल्या जातात. शरीर कमविण्यासाठी स्टेरॉईड्सचा वापर करतात. त्याचा परिणाम डोळ्यांवर होतो.
लहान मुलांची दृष्टी अलीकडे कमकुवत होत चालली आहे, त्याची कारणे कोणती?
डॉ. लहाने : त्याचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे पालक. काही महिन्यांच्या मुलांना मोबाइल खेळायला दिला जातो. त्यामुळे सवय जडते. मुले सतत स्क्रीनकडे पाहतात. त्यामुळे मोबाइलमधून निघणारा प्रकाश त्यांच्या डोळ्यांत जातो. मुलांच्या डोळ्यांची वाढ पूर्ण झालेली नसल्याने त्यांची नजर कमकुवत होते. त्यामुळे मुलांचे डोळे कोरडे पडतात, लाल होतात आणि दृष्टी अधू होते. लहान मुलांना ६ वर्षांपर्यंत मोबाइल अजिबात देऊ नये. ६ ते १२ वर्षांमधील मुलांना दिवसातून एक तासाहून अधिक मोबाइल देणे टाळावे.
नेत्रविषयक कोणते नवे संशोधन झाले ?
मोतीबिंदूसाठी आता लेझरचा वापर वाढला आहे. त्याच्यात आता फेमोंसेकल नावाचा लेझर आला आहे, ज्याने अर्धवट मोतीबिंदू काढता येतो. बुबुळाला रिप्लेसमेंट आहे; पण रेटिनाला नव्हती. सध्या रेटिनल चीपवर संशोधन सुरू आहे. त्याने दृष्टी येण्याची शक्यता वाढली आहे.
नेत्रविषयांत कोणती आव्हाने आहेत?
डॉ. लहाने : डोळे मिळत नाहीत, ही सर्वांत मोठी अडचण आहे. आपल्याकडे दरवर्षी ९० लाखांपेक्षा जास्त रुग्णांना मोतीबिंदू होतो; पण वर्षाला २५ हजार लोकच नेत्रदान करतात. भारत हा खंडप्राय देश असूनही डोळ्यांचे टिशू मिळत नाहीत. अमेरिकेत ज्या वयाच्या रुग्णाला टिशूची गरज असते, त्यांना तो मिळतो. तेथील नेत्रपेढीत तो उपलब्ध असतो. आपल्याकडे तसे होत नाही.
डॉ. पारेख : शस्त्रक्रियेसाठी डोळा उपलब्ध झाल्यानंतर कोणाला बोलावले, तर अनेकदा आम्हाला वेळ नाही, असे रुग्ण अथवा त्यांच्या नातेवाइकांकडून सांगितले जाते. डोळ्यांचा वापर करताना वेळेचे मोठे महत्त्व आहे. पण अज्ञानामुळे लोक येणे टाळतात, असाही अनुभव येतो.
डोळ्यांचा अधिक उपयोग कसा करता?
डॉ. लहाने : एक डोळा आपण दोन माणसांना वापरू शकतो. एका डोळ्याचा अलीकडचा एक भाग आणि पलीकडचा एक भाग, म्हणजेच कॉर्निआचा जाडपणा हा साडेपाच मिलीलीटर असतो. एक भाग अडीच मिलीलीटर तर दुसरा भाग तीन मिलीलीटर असतो. ते दोन्ही भाग आपण वापरतो. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानामुळे अधिकाधिक रुग्णांना कसा फायदा करून देता येईल, याकडे आमचा कटाक्ष असतो.
जे.जे.चे अधिष्ठाता म्हणून काम करताना अनेक चढ-उतार आले...
डॉ. लहाने : तीनवेळा मी अधिष्ठाता होण्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर जून २०१०मध्ये मी अधिष्ठाता पदाची सूत्रे स्वीकारली. पहिल्या काही दिवसांत मला खूप विरोध झाला. कामाच्या पद्धतीमुळे एका यंत्रणेला धक्का बसला. माझ्याविरुद्ध लॉबी सक्षमपणे कार्यरत होती. या यंत्रणेत सक्रिय असणाऱ्या व्यक्ती मला येऊन भेटल्या. त्यांनी मला पडताळून पाहिले. मी तटस्थपणे सर्व ऐकून घेतले. या यंत्रणेची कार्यपद्धत लक्षात आल्यावर काम सुरू केले. रुग्णालयात स्वच्छता मोहीम घेतली. १०० ट्रक कचरा काढला. रुग्णालयाच्या स्वयंपाकघरात एक महिना स्वत: काम केले. सर्व कामकाज आॅनलाइन करून पारदर्शकता आणली.
डॉ. पारेख : अधिष्ठाता केबिनमध्ये बसून राहिल्यास त्याला रुग्णालयाची परिस्थिती कळू शकत नाही. पण, सरांना रुग्णालयातील प्रत्येक ठिकाणची माहिती असते. कारण, ते अधिष्ठाता असले तरी रुग्णालयात त्यांचा वावर असतो. रात्रीही व्हरांड्यात, वॉर्डमध्ये ते अचानक पोहोचतात. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात एक भीती असते, अधिष्ठाता आले तर उत्तर द्यावे लागेल. त्यामुळे सगळे कामे व्यवस्थितपणे करतात. त्यामुळे रुग्णालयात आमूलाग्र बदल झाले.
रूग्णालयात गोष्टी कशा बदलल्या?
डॉ. लहाने : अधिष्ठाता म्हणून कार्यभार स्वीकारल्यावर लक्षात आले, येथे सुविधा आहेत. पण, त्यांचा योग्य पद्धतीने वापर होत नाही. त्या वेळी जे.जे. म्हणजे रुग्णाचा मृत्यू असे समीकरण होते. हे समीकरण आता बदलले आहे. एक रुग्ण किमान २२ ते २५ दिवस रुग्णालयात दाखल असायचा. आता ते प्रमाण ७ दिवसांवर आले. तेव्हा वर्षाला बाह्य रुग्ण विभागातील रुग्णांची संख्या साडेचार लाखांवर कधीच गेली नव्हती. आता दरवर्षी या विभागात ९ लाख रुग्ण येतात. आधी १६ हजार शस्त्रक्रिया व्हायच्या. आता वर्षाला ३२ हजार मोठ्या शस्त्रक्रिया तर, ३० हजार लहान शस्त्रक्रिया होतात. आधी पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या ९७ सीट्स होत्या. आता याची संख्या १६५ इतकी आहे.
एवढ्या शस्त्रक्रिया करण्याचा हा प्रवास कसा होता?
डॉ. लहाने : हे यश माझ्या एकट्याचे नाही. हे आमच्या ‘टीम वर्क’मुळे शक्य झाले. प्रत्येक डॉक्टरच्या आयुष्याचा एक ग्राफ असतो. १० ते २० वर्षांत एक पीक पॉइंट असतो. त्यानंतर त्याच्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या तितकीच राहते किंवा हळूहळू कमी होते. मी १९८६ साली काम सुरू केले. गेल्या ३० वर्षांत माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांची संख्या ही वाढतच गेली. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे १०० टक्के यशस्वी होणाऱ्या शस्त्रक्रिया. त्या व्यक्तीला सुस्पष्ट दृष्टी मिळावी, याच ध्येयाने आम्ही काम करतो. त्यामुळेच हे शक्य झाले.
तुम्हाला ऊर्जा कुठून मिळते?
डॉ. लहाने : आमच्यासाठी कितवीही शस्त्रक्रिया असली तरीही व्यक्तीसाठी मात्र त्याचा एकच डोळा असतो. रुग्णांच्या चेहऱ्यावर सकाळी दिसणारे समाधान हे महत्त्वाचे आहे. त्यांना दिसायला लागल्यावर त्यांच्या फुलणाऱ्या हास्यातून आम्हाला प्रेरणा मिळते. आठवड्यातून दोन ते तीनवेळा शाल, श्रीफळ लोक देतात. त्यातून कामाची ऊर्जा मिळत जाते. मला माझ्या आईने किडनी दिल्यामुळे दुसरा जन्म मिळाला. माझ्या आईला वाटू नये, माझ्या मुलाने काहीच काम केले नाही. म्हणून रुग्णसेवा मी सतत करीत असतो. अजून खूप काही करायचे आहे. राज्यातील कोणत्याही गावात उतरलो की ओळखणारे लोक भेटतात, याहून दुसरे काय हवे?

नेत्रदानाविषयी जनजागृती म्हणावी तेवढी झाली आहे का?
डॉ. लहाने, डॉ. पारिख : दरवर्षी अपघातात अडीच लाख मृत्यू होतात. पण, त्याप्रमाणात नेत्रदान होत नाही. आपल्याकडे डोळा मिळत नाही. अंधश्रद्धेमुळे नेत्रदानाचा टक्का कमी आहे. अजूनही आपल्याकडे हाच विचार आहे, डोळ्यांतून प्राण जातो. येताना डोळ्यांतूनच येतो. त्यामुळे डोळे दान केल्यास परत प्राण कसा येणार? पुनर्जन्म झाल्यास दृष्टी मिळत नाही किंवा भुताचा जन्म मिळतो, अशीही अंधश्रद्धा आहे. म्हणून ज्यांच्याकडे आत्तापर्यंत एकदाही नेत्रदान झालेले नाही. त्या गावात सरपंचांशी आम्ही संवाद साधून नेत्रदानाचे महत्त्व पटवून देतो. तथापि, नेत्रदानाची चळवळ वाढण्यासाठी तरुणांनी एकत्र येणे गरजेचे आहे. स्वयंसेवी संस्था, शासन, प्रसारमाध्यमांनी याकामी हातभार लावावा.

(मुलाखत : पूजा दामले)

Web Title: 'Patients' humor inspiration'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.