मुंबईतील रुग्णालयांतही म्युकाेरमायकोसिसचे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:06 AM2021-05-11T04:06:31+5:302021-05-11T04:06:31+5:30

१२ जणांनी गमावला डाेळा; लवकर निदान झाल्यास उपचार सोपे, तज्ज्ञांचे निरीक्षण स्नेहा मोरे लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईतील ...

Patients with myocardial infarction in Mumbai hospitals | मुंबईतील रुग्णालयांतही म्युकाेरमायकोसिसचे रुग्ण

मुंबईतील रुग्णालयांतही म्युकाेरमायकोसिसचे रुग्ण

Next

१२ जणांनी गमावला डाेळा; लवकर निदान झाल्यास उपचार सोपे, तज्ज्ञांचे निरीक्षण

स्नेहा मोरे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईतील केईएम, नायर आणि सायन या पालिका रुग्णालयांतही म्युकाेरमायकोसिस रुग्णांचे निदान मागील कोरोना लाटेच्या तुलनेत वाढले आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या निरीक्षणानुसार, या आजाराचे लवकर निदान झाल्यास उपचार कऱणे सुलभ होते. मात्र सध्या उशिरा निदानामुळे बऱ्याच रुग्णांसाठी हा आजार जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येत आहे.

नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले, नायरमध्ये मागील दोन आठवड्यात पोस्ट कोविड ओपीडीत म्युकाेरमायकोसिसचे २ ते ३ रुग्ण दिसून आले आहेत. मात्र या आजाराची लाट आली आहे, अशी स्थिती नाही. त्यामुळे कोणीही घाबरून न जाता कोरोनाचे उपचार घेताना व कोरोनामुक्तीनंतरही रुग्णांनी या आजाराच्या लक्षणांकडे लक्ष द्यावे आणि त्वरित तज्ज्ञांचा सल्ला, निदान आणि उपचारावर भर द्यावा.

केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितले, काेराेनाच्या पहिल्या लाटेत म्युकाेरमायकोसिसच्या ११ रुग्णांचे निदान झाले होते. दुसऱ्या लाटेत आतापर्यंत २५ रुग्णांचे निदान झाले आहे. त्यातील १६ रुग्ण सध्या उपचार प्रक्रियेत असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कोरोनाच्या उपचारांत मधुमेही रुग्णांना आणि उच्च रक्तदाब असलेल्या लोकांना काळ्या बुरशीच्या संसर्गाचा सर्वाधिक धोका असू शकतो. याव्यतिरिक्त, स्टेरॉयडच्या वापरामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. बराच काळ आयसीयूमध्ये राहणे, गंभीर आजार आणि व्होरिकोनाझोल थेरपीमुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त आहे.

* स्टेरॉयडमुळे रोगप्रतिकारकशक्ती हाेते कमी

सायन रुग्णालयात दर आठवड्याला २ ते ३ रुग्णांमध्ये म्युकोरमायकोसिस आजाराचे निदान होते आहे. कोरोनापूर्वी वर्षाला केवळ आठ रुग्णांना या संसर्गाची लागण होत असल्याचे निरीक्षण होते. परंतु, आता दोन महिन्यांत ३० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. कोविड रुग्णांना मधुमेह असेल तर या आजाराचा धोका अधिक असताे. त्यात कोरोनाच्या उपचार प्रक्रियेत स्टेरॉयडचा वापर केला जातो. त्यामुळे शरीरातील साखरेची पातळी अनियंत्रित होऊन काळ्या बुरशीचा संसर्ग होण्याचा धोका संभावतो. काही स्टेरॉयडमुळे रोगप्रतिकारकशक्तीही कमी होते, त्याने हा संसर्ग अधिक वाढतो.

* डोळ्यानंतर संसर्ग पोहोचतो मेंदूपर्यंत

म्युकाेरमायकोसिस या आजाराच्या सुरुवातीला नाकातून पाणी येणे, त्यातून थोडसे रक्त येणे, जबड्याच्या आत संवेदना न जाणवणे, ही लक्षणे आढळतात. मात्र त्यावेळेस रुग्ण तपासणीस येत नाही. हा संसर्ग ज्यावेळेस डोळ्यापर्यंत पोहोचतो, त्यावेळेस रुग्ण रुग्णालयात उपचारांकरिता येतात, तोपर्यंत उशीर झालेला असतो. डोळ्यानंतर हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचतो. या स्थितीत रुग्ण असल्यास शस्त्रक्रिया करून बाधित त्वचा काढून टाकावी लागते, त्यानंतर ६ आठवडे इंजेक्शन द्यावे लागते. हे सर्व उपचार रुग्णालयात दाखल करून करावे लागतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

* महिलेचे दाेन्ही डाेळे काढले

डोळ्यांतील संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यावर हा आजार जीवघेणा ठरतो. अशा स्थितीत रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी सायन रुग्णालयातील एकूण ३० बाधितांपैकी ११ ते १२ रुग्णांचा एक डोळा काढण्यात आला. तर एका ४७ वर्षीय महिला रुग्णाचे दोन्ही डोळे काढण्यात आले, त्यानंतर तिचा जीव वाचविण्यात डॉक्टरांना यश आले. परंतु, ही स्थिती फार कमी वेळा उद्भवते. त्यामुळे पोस्ट कोरोना काळात रुग्णांनी नाक वा तोंडात काहीही प्राथमिक लक्षणे जाणवल्यास त्वरित कान-नाक-घसा तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाच्या प्रमुख डॉ. रेणुका ब्राडो यांनी दिली आहे.

* काय काळजी घ्याल?

आयसीएमआरच्या मते, कोरोनातून बरे झालेल्या मधुमेही रुग्णांनी रक्तातील ग्लुकोज पातळी तपासणी सातत्याने करणे गरजेचे आहे. स्टेरॉयड घेताना, योग्य वेळ, योग्य डोस आणि कालावधी लक्षात ठेवा. ऑक्सिजन थेरपी दरम्यान स्वच्छ पाण्याचा वापर करा. रुग्ण प्रतिजैविक आणि अँटिफंगल वापरत असेल तर काळजी घेणे गरजेचे आहे. कोविडच्या उपचारानंतर म्युकाेरमायकोसिसची लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.

........................

Web Title: Patients with myocardial infarction in Mumbai hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.