तलासरी : आधीच ग्रामीण भागात शासनाच्या आरोग्य सेवेचा बोजवारा उडालेला असताना डॉक्टरांनी मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाने तलासरी आदिवासी भागात रुग्णांचा जीवच धोक्यात आल्याचा प्रत्यय गुरुवारी आला. सर्पदंशाने गंभीर झालेल्या महिलेवर तलासरीतील डॉक्टरांनी संपाचे कारण देत उपचार करण्यास नकार दिल्याने या प्रकाराबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे.तलासरी महसूल विभागातील मंगेश देसाई या कर्मचाऱ्याच्या पत्नीला आज गुरुवारी पहाटे झोपेत सर्पदंश केला. यावेळी तिला उपचारासाठी तलासरी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, परंतु यावेळी तेथील डॉक्टरांनी आम्ही संपावर असल्याने उपचार करणार नाही, असे सांगितले. सर्पदंशाने महिलेची प्रकृती गंभीर होत असल्याने डॉक्टरांना अनेकवेळा उपचारासाठी विनंत्या केल्या, पण तलासरी ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर उपचार न करता आपल्या संपावर ठाम राहिले. सर्पदंश झालेल्या महिलेचा जीव धोक्यात आहे, तिच्यावर माणुसकीच्या नात्याने उपचार करा,असे तहसीलदार गणेश सांगळे यांनीही विनंती केली, पण डॉक्टर आपल्या मतावर ठामच राहिल्याने घटनेचे गांभीर्य ओळखून तहसीलदारांनी तलासरीपासून ५० कि.मी. अंतरावरील सिल्व्हासा येथील रूग्णालयात तिला तत्काळ दाखल केल्याने त्या महिलेच्या जीवावरील संकट टळले, पण तिला अधिक उपचारासाठी विनोबा भावे रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.तलासरी हा आदिवासी दुर्गम भाग असल्याने येथे आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला आहे. वैद्यकीय सेवा मिळत नसल्याने आदिवासी रुग्णाना बाहेरगावी जाऊन महागडे उपचार करून घ्यावे लागतात. त्यातच माणुसकीशून्य डॉक्टर जर रुग्णालयात असतील तर रुग्णाचा जीव धोक्यातच येणार. याबाबत तलासरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजेश खेमनार यांच्याकडे विचारणा केली असता संपावर असल्याने डॉक्टरांनी उपचारास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.
संपामुळे रुग्णांचा जीव धोक्यात
By admin | Published: July 04, 2014 12:42 AM