रुग्णांसाठीच्या खोल्या डॉक्टरांच्या सेवेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 06:49 AM2017-08-08T06:49:52+5:302017-08-08T06:49:52+5:30
सेंट जॉर्ज रुग्णालयातील नर्सिंगहोम विभागातील खोल्यांचा गैरवापर होत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या खोल्या रुग्णालयाच्या अधीक्षकांनी आपल्या मर्जीतील दोन डॉक्टरांना दिल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सेंट जॉर्ज रुग्णालयातील नर्सिंगहोम विभागातील खोल्यांचा गैरवापर होत असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. या खोल्या रुग्णालयाच्या अधीक्षकांनी आपल्या मर्जीतील दोन डॉक्टरांना दिल्या आहेत. यामुळे सामान्य रुग्णांना मिळणाºया सेवा-सुविधांवर विपरित परिणाम होत असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते आणि राज्य शासनाच्या अभ्यागत मंडळ समितीचे सदस्य संजय गुरव यांनी केला आहे. मात्र, त्या खोल्या नर्सिंग विभागाच्या नाहीत, असे सांगत, सेंट जॉर्ज रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मधुकर गायकवाड यांनी आरोप फेटाळला आहे.
सेंट जॉर्ज रुग्णालयातील पी.टी.एफ. विभागात दुरुस्ती झाल्याने, या खोल्या नर्सिंगहोम विभागातील रुग्णांसाठीच देणे आवश्यक होते. मात्र, त्या आरएमओ डॉ. भूषण वानखेडे आणि डॉ. राहुल पारदे यांना देण्यात आल्या आहेत. यामुळे रुग्णांची गैरसोय होते आहे. शिवाय, या विभागात पाच खोल्यांची बांधकाम दुरुस्ती सुरू असल्याने, शासनाला मिळणाºया महसुलाला मुकावे लागत असल्याचे, गुरव यांनी माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितले.
रुग्णालयाच्या आवारात ७ निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत, असे असतानाही नर्सिंगहोममधील खोली क्रमांक २ व ३ मधील खोल्यांचा वापर उर्वरित निवासी वैद्यकीय अधिकाºयांना देण्याचे कोणतेही प्रयोजन नाही, असेही गुरव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
निवासी डॉक्टरांच्या वसतिगृहात बºयाच खोल्या उपलब्ध आहेत, त्यातील खोल्या देणे शक्य झाले असते. मात्र, तसे करण्यात आले नाही, तसेच यापूर्वी रुग्णालयात राज्यपाल रा. सू. गवई व समकक्ष अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना ज्या खोल्यांमध्ये सेवा दिली जात होती, ती खोलीही गोदाम म्हणून वापरली जात असल्याचा गुरव यांचा आरोप आहे. रुग्णांसाठीच्या खोल्या अन्य कारणासाठी वापरतात, तेव्हा धोरण बदलले जाते. अशा बाबींसाठी पूर्वमान्यता संचालक व अधिष्ठाता यांनी घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट करत, गुरव यांनी याविषयी लेखी तक्रार करून, वैद्यकीय संचालनालयाकडे चौकशीची मागणी केली आहे. तर सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक मधुकर गायकवाड यांनी माहिती अधिकाराला उत्तर देताना, संस्थाप्रमुख म्हणून संचालक व अधिष्ठाता यांची परवानगी घेण्याची आवश्यकता नसल्याचे स्पष्ट केले आहे.