पाटणा पोलिसांची मालवणी पोलिसांना 'सरप्राईज व्हिजिट' !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 12:43 PM2020-08-02T12:43:38+5:302020-08-02T12:43:53+5:30
तपास अधिकारी न भेटल्याने रिकामी हाती परतले; दिशा सालीयन प्रकरणाची करायची होती चौकशी
गौरी टेंबकर - कलगुटकर
मुंबई: सुशांत सिंग राजपूत (३४) आत्महत्या प्रकरणात दिशा सालीयनच्या मृत्यूचे काय कनेक्शन आहे ? हे तपासण्यासाठी पाटणा पोलिसांचे पथक शनिवारी मालवणी पोलीस ठाण्यात धडकले होते. मात्र तपास अधिकाऱ्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांना तिथून खाली हात परतावे लागले.
सुशांत मृत्यू प्रकरणाचा दिशा सालीयन (२८) शी काही संबंध आहे का? याची चौकशी करण्यासाठी शनिवारी रात्री नऊच्या सुमारास पाटणा पोलिसांनी मालवणी पोलीस ठाण्याला अचानक भेट दिली. या भेटीबाबत मालवणी पोलिसांना काहीच कल्पना नव्हती. त्यामुळे त्याठिकाणी गोंधळ उडाला. दिशा च्या प्रकरणाचा तपास करणारे मालवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद कनवजे यांना भेटण्याची विनंती केली. मात्र कनवजे हे पोलीस ठाण्यात नाहीत असे उत्तर त्यांना मालवणी पोलिसांकडून देण्यात आले. त्यामुळे ते तिथुन परत गेले. मात्र त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त व्ही ठाकूर यांनी वरिष्ठांच्या निर्देशानुसार मालवणी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि उशीरारात्री पर्यंत ते पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्यांशी चर्चा करत आणि तपासाच्या कागदपत्रांची पडताळणी करत होते अशी माहिती आहे.
जनकल्याणनगरच्या गॅलेक्सी इमारतीत बाराव्या मजल्यावरुन पडून दिशाचा मृत्यू झाला होता. तिची आई वासंती सालीयन यांनी दिशा सुशांतची मॅनेजर नव्हती असे नुकतेच एका इंग्रजी वर्तमानपत्रात दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. तर मालवणी पोलिसांनी देखील दिशाचा सुशांत प्रकरणात काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र दिशाच्या मृत्यूमुळे सुशांत अस्वस्थ झाल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता.
दिशाला २५ लाखांचे कंत्राट देऊ करणाऱ्या एका कंपनीने शरीर सौष्ठव शो आयोजित करत त्यात अभिनेत्री दिशा पाटणी हिचा डान्स परफॉर्मन्स ठेवण्याची अट ठेवली. मात्र पाटणीच्या नकारामुळे ती फिस्कटली. तर दिशाच्या मध्यस्थीने सुपरमॉडेल मिलिंद सोमण यांच्यासोबत व्हीवो मोबाईल कंपनीने केलेले फोटोशूट रद्द करत ते नवीन मॉडेल सोबत करण्याचा तगादा कंपनीने लावला होता. कारण सोमण यांनी चीनची खिल्ली उडविणारे ट्विट केल्याने कंपनी चिडली होती. मात्र त्यामुळे तिला १७ लाख रुपये परत करावे लागणार होते या तणावात ती होती. त्यातूनच तिने हे पाऊल उचलले असावे असे जबाबात तिच्या नातेवाईकांनी संगीतल्याचे पोलिसांचे म्हणणे होते. तिच्या घरच्यांनीही कोणा विरोधात तक्रार केली नसल्याचे अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे सुशांतशी काही संबंध नसल्याचे तपास अधिकाऱ्यांचे म्हणणे होते.