मुंबई : म्हाडा करत असलेल्या पुनर्विकासाबाबतच्या कामाची माहिती पत्रा चाळ संघर्ष समितीच्या सदस्यांना देत येत्या आठ ते दहा दिवसांत कामाचे मूल्यांकन करून ते टेंडर काढण्यात येईल. ऑक्टोबर महिन्यात भाडे आणि काम सुरू करण्यात येईल, असे आश्वासन म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर यांनी दिल्याचे संघर्ष समितीने सांगितले. पत्रा चाळ संघर्ष समितीच्या सदस्यांनी अनिल डिग्गीकर यांची भेट घेतली त्या वेळी ते बोलत होते.
म्हाडाच्या असंवेदनशील धोरणामुळे तब्बल १२ वर्षांपासून गोरेगाव येथील पत्रा चाळीतील ६७२ रहिवासी पुनर्विकास प्रकल्पा अंतर्गत हक्काच्या घरांपासून वंचित होते. आता घर मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गोरेगावमधील सिद्धार्थनगर (पत्रा चाळ) येथील म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास करून हजारो कुटुंबांना दिलासा देणारा निर्णय काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यावर येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले.
गोरेगाव येथील पत्रा चाळीतील रहिवाशांच्या संकुलाचे काम ठप्प पडले. गेल्या ५ वर्षांपासून रहिवाशांना घराचे भाडेदेखील मिळाले नाही. इकडे आड तिकडे विहीर अशी रहिवाशांची अवस्था झाली. कोरोनामुळे तर पत्रा चाळ रहिवासी आणखी आर्थिक अडचणीत आले. घरात किराणा भरण्यापासून राहत्या घराचे भाडे भरण्यापर्यंतच्या अनेक आर्थिक संकटांचा सामना रहिवाशांना करावा लागला. पुनर्विकास प्रकल्प रखडल्याने एका दशकात बहुतांशी कुटुंबांनी घराच्या प्रतीक्षेत अखेर मुंबई सोडली. काही रहिवाशांचे निधन झाले.
अनेक कुटुंबांच्या नशिबी हलाखीचे जगणे आले. रहिवाशांचे भाडेविना व घराच्या प्रतीक्षेत एक तप निघून गेले. काही रहिवासी रोगांचे बळी ठरले. आर्थिक समस्यांनी घराघरांत क्लेश वाढले. जगणे असह्य झाले. रहिवाशांना गोरेगाव सोडून विरार, वसईच्या पुढे जावे लागले. म्हाडाने प्रस्तावित केल्याप्रमाणे प्रकल्पामध्ये विक्री इमारतींचे बांधकाम जवळपास पूर्ण केलेल्या ३ विकासकांबरोबर म्हाडा समझोता करार करीत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला आहे. पुनर्विकास प्रकल्पामधील मूळ रहिवाशांचे पुनर्वसन करणे, मूळ रहिवाशांचे थकीत भाडे देणे, म्हाडा हिश्शातील बांधकामाच्या सोडतीमधील ३०६ विजेत्यांना सदनिकांचे वितरण करणे या मुद्द्यांच्या अनुषंगाने उपाययोजना सुचविण्यासाठी सेवानिवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पत्रा चाळ येथील म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत हा निर्णय घेतला गेला.
------------------------
- म्हाडा या प्रकल्पाचा स्वत: विकास करेल.
- हे करताना पत्रा चाळ येथील मूळ ६७२ गाळेधारकांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करून त्यांना गाळ्यांचा ताबा देण्यात येईल.
- म्हाडाच्या हिश्शातील सोडत काढलेल्या ३०६ सदनिकांच्या इमारतींची कामे पूर्ण करून संबंधितांना सदनिकांचा रीतसर ताबा देण्यात येईल.
- संपूर्ण पुनर्विकास प्रकल्पाचे काम म्हाडातर्फे पूर्ण करावयाचे आहे.