मुंबई : गोरेगाव पत्रा चाळ पुनर्विकास प्रकल्पातील प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा शुभारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी सायंकाळी ५ वाजता गोरेगाव पश्चिम येथील प्रबोधन क्रीडा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे.
पुनर्विकास प्रकल्पातील ६७२ मूळ गाळेधारकांच्या प्रलंबित सदनिकांच्या बांधकामाचा प्रश्न या माध्यमातून मार्गी लागणार आहे. ६७२ मूळ गाळेधारकांना पुनर्विकास प्रकल्पाच्या माध्यमातून ६५० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका मिळणार आहे. म्हाडा स्वतः विकासक म्हणून या संपूर्ण प्रकल्पाचे काम करीत आहे.
४७ एकर जमिनीवर असणाऱ्या पत्रा चाळीच्या पुनर्विकासासाठी पत्रा चाळीतील गाळेधारकांची सहकारी गृहनिर्माण संस्था, गुरुआशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड व म्हाडा यांच्यात त्रिपक्षीय करारनामा झाला होता. मात्र, विकासकाने पुनर्विकास प्रकल्प अनेक वर्षे रखडविला, तसेच रहिवाशांना विकासकाकडून भाडे न दिल्यामुळे करारपत्रातील अटीनुसार म्हाडाने १२ जानेवारी २०१८ रोजी संबंधित विकासक व संस्थेस टर्मिनेशन नोटीस जारी केली.
नोटीसविरुद्ध विकासकाने या प्रकल्पातील विक्री हिस्सा म्हाडाच्या परवानगीशिवाय नऊ विकासकांना परस्पर विकल्याने नऊ विकासकांनी उच्च न्यायालयात दावे दाखल केले. अशा विविध घटनांमुळे गेली अनेक वर्षांपासून हा पुनर्विकास प्रकल्प रखडला आहे. बांधकामासाठी म्हाडामार्फत निविदा खुली करण्यात आली. पहिल्या निम्नतम निविदाकार रेलकॉन इन्फ्रा प्रोजेक्टस् लिमिटेड यांना प्राधिकरणाच्या निविदा अधिकार प्रदानतेनुसार मान्यता घेऊन स्वीकृती पत्र देण्यात आले आहे.
सदनिकांची वैशिष्ट्ये
- ६७२ मूळ गाळेधारकांना प्रत्येकी ६५०.०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाची सदनिका
- व्हिट्रिफाइड फ्लोअरिंग टाइल्स
- ग्रेनाइट किचन ओटा स्टेनलेस स्टील सिंकसह
- अल्युमिनियम स्लायडिंग खिडक्या
- बाथरूम व टॉयलेटमध्ये फुल हाइट सिरॅमिक टाइल्स
- अद्ययावत लिफ्ट