Join us

प्लॅटफॉर्मवर ‘सेग वे’द्वारे करणार पेट्रोलिंग....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 1:34 PM

मुंबईची लाइफ लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलमधून लाखो लोक प्रवास करतात. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे पोलिसांकडून कसे नियोजन करण्यात येत आहे? याबाबत रेल्वे पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्याशी वरिष्ठ प्रतिनिधी मनीषा म्हात्रे यांनी केलेली बातचीत...

डॉ. रवींद्र शिसवे, रेल्वेपोलिस आयुक्त

रेल्वे हद्दीतील गुन्हे कमी करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहेत? २०१९ च्या तुलनेत २०२३ मध्ये गुन्ह्यांचे प्रमाण ५५ टक्क्यांनी कमी झाले आहे. दोषसिद्धी दर देखील वाढला आहे. पोलिस ठाण्यात येणारी प्रत्येक तक्रार तत्काळ निकाली काढण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोबाइलचोरी, पाकीटमारी यांचे प्रमाण अधिक आहे. सीसीटीव्हीच्या प्रभावी वापरामुळे रेल्वे पोलिसांचा गुन्हे सिद्धीचा दर ९५ टक्के आहे. अन्य पोलिसांच्या तुलनेत हा दर सर्वांत जास्त आहे. कोणी तक्रार नोंदवून घेण्यास उशीर किंवा टाळाटाळ करत असल्यास त्याच्यावरही कारवाई करण्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आला आहे. पोलिस मदत करतात की नाही? यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात क्यूआर कोड सिस्टम लावण्यात आली आहे. यामध्ये संबंधित पोलिस ठाण्यातून कसा प्रतिसाद मिळाला? याबाबत तक्रारदार रेटिंग देऊ शकतो. तक्रारदाराला कुठे त्रास झाल्याचे समजताच संबंधित पोलिसांवर थेट कारवाई केली जाते. कारवाईच्या भीतीमुळे पोलिस ठाण्यात येणाऱ्या प्रत्येकाला सहकार्य मिळते.

महिला सुरक्षेसाठी काय पावले उचलण्यात येत आहेत? पारंपरिक आणि आधुनिक अशा दोन्ही पद्धतीने महिला डब्यांमध्ये सुरक्षा पुरविण्यास प्राधान्य आहे. गेल्या वर्षभरात महिलांसंबंधित केवळ ७८ गुन्हे नोंद झाले आहेत. ते सर्व गुन्हे निकाली काढण्यात आले आहेत. प्रत्येक डब्ब्यात सीसीटीव्ही कार्यान्वित आहेत. आपत्कालीन परिस्थितीत महिलांना गार्डशी संवाद साधण्यासाठी ४२२ डब्यांमध्ये टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. स्थानकाप्रमाणे महिला डब्यातील सीसीटीव्हीमध्येही एफआरएस तंत्रज्ञानाचा समावेश होणार आहे. पश्चिम रेल्वेवर एफआरएसयुक्त सीसीटीव्हीमुळे ११४ गुन्ह्यांची उकल झाली. महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया, खाकीतील सखीसह हेल्पलाइन सेवा सुरू आहे.

मनुष्यबळाचा तुटवडा कसा भरून काढणार? पोलिसांवर जवळपास ८० लाख प्रवाशांची जबाबदारी आहे. सुरुवातीला रेल्वे पोलिसांच्या दिमतीला ६०० होमगार्ड होते. आता १,७०० होमगार्ड आहेत. नुकत्याच झालेल्या पोलिस भरतीतून ६२० जणांना घेण्यात आले. मनुष्यबळ जास्तीत जास्त वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे, सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस ठाण्यांची संख्या वाढविण्यात येत आहे. सद्य:स्थितीत १७ पोलिस ठाणे आहेत. पहिल्या टप्प्यात चार नवीन पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहेत. आसनगाव, अंबरनाथ, मीरा भाईंदर आणि एलटीटी परिसरात पोलिस ठाणे सुरू करण्यात येणार आहेत. यासोबतच, व्हिजिबल पोलिसिंग वाढविण्यासाठी प्लॅटफॉर्मवर ‘सेग वे’ या वाहनाचा वापर करण्यात येणार आहे. लवकरच प्लॅटफॉर्मवर ‘सेग वे’वरून पोलिसांची गस्त होताना दिसून येईल. या गस्तीमुळे गुन्हेगारांवर वचक राहील. प्लॅटफॉर्मवरील पोलिसांमुळे प्रवाशांना आधार मिळेल.

टॅग्स :पोलिसरेल्वे