खड्ड्यांनी आणला शिवसेनेच्या तोंडाला फेस

By admin | Published: July 18, 2014 01:05 AM2014-07-18T01:05:54+5:302014-07-18T01:05:54+5:30

मुंबईत दररोज सरासरी १०० खड्डे पडत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत़

PATS brought the face to Shivsena's face | खड्ड्यांनी आणला शिवसेनेच्या तोंडाला फेस

खड्ड्यांनी आणला शिवसेनेच्या तोंडाला फेस

Next

मुंबई : मुंबईत दररोज सरासरी १०० खड्डे पडत असल्याच्या तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत़ याबाबत वॉर्ड अधिकारी कानावर हात ठेवत असून, सत्ताधारी शिवसेनेने अतिमहत्त्वाच्या रस्त्यांनाच खड्डेमुक्त करण्याची मोहीम घेतली़ त्यामुळे ऐन पावसाळ्यात मुंबईकरांची वाट मात्र बिकट झाली आहे़
जुलै महिन्यात मुसळधार पावसाने जोर धरल्यामुळे १७ दिवसांतच मुंबईत १७०० खड्ड्यांची नोंद झाली आहे़ मात्र खड्डे बुजविण्याचे काम आता वॉर्डातील अभियंत्यांकडे सोपविले आहे़ त्यामुळे या कामावर आता कोणाचा वचक नसल्याने खड्डे बुजविण्याचे काम संथगतीने सुरू आहे़ नागरिकांकडून पाठविलेले छायाचित्र व तक्रारी विभाग कार्यालयातून पुढे सरकविण्यात येत नसल्याची धक्कादायक बाबही सूत्रांकडून हाती आली आहे़ एकीकडे अधिकारी असा कामचुकारपणा करीत असताना सत्ताधारी शिवसेनेच्या अजेंड्यावर मात्र व्हीआयपी रस्तेच आहेत़ विल्सन कॉलेजसमोरील रस्त्यावर असाच खड्डा पडला आहे़ या रस्त्यावरून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची वर्दळ असल्याने पालिकेने तत्काळ तेथे दुरुस्तीचे काम घेतले़ विशेष म्हणजे स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी स्वत: त्यात लक्ष घातले़ पेडर रोडवरील खड्ड्याचे कामही युद्धपातळीवर हाती घेतले़
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पेडर रोड येथील घरासमोरच मोठा खड्डा पडला आहे़ याबाबत थेट मातोश्री बंगल्यावरूनच फोन आला़ हा खड्डा तत्काळ बुजविण्याची ताकीद पक्षश्रेष्ठींनी दिल्यामुळे शिवसेनेचे शिलेदार कामाला लागले आहेत़ पेडर रोडच्या पुलाचा वाद अद्याप कायम असल्याने या रस्त्यावर मोठे काम घेता येत नाही़ पण, या खड्ड्याच्या दुरुस्तीची सूचना तत्काळ दिली़ याला स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनीच दुजोरा दिला़
खड्ड्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्ष आणि प्रसारमाध्यमांनी सध्या सत्ताधाऱ्यांना जाब विचारून भांडावून सोडले आहे़ खड्ड्यांच्या प्रश्नांनी तोंडाला फेस आणल्यामुळे सत्ताधारी उत्तर देण्यासही राजी नाहीत़ याबाबत स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांना विचारले असता, खड्डे आणि पाण्याशिवाय दुसरे विषय नाहीत का? तुम्हाला पॉझिटिव्ह कामं दिसत नाहीत का? मी काय अधिकाऱ्यांना बोलावून बैठका घेत बसू का? अशी आदळआपट करीत फणसे यांनी खड्ड्यांच्या प्रश्नातून आपली सुटका करून घेतली़ (प्रतिनिधी)

Web Title: PATS brought the face to Shivsena's face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.