वांद्रे-कुर्ला संकुलात रंगली ‘पेटॅथॉन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:30 AM2017-11-06T04:30:31+5:302017-11-06T04:30:35+5:30
साई इस्टेट कन्सल्टंट्सतर्फे रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलात ‘साई सेलिब्रेशन रन अँड पेटॅथॉन’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : साई इस्टेट कन्सल्टंट्सतर्फे रविवारी वांद्रे-कुर्ला संकुलात ‘साई सेलिब्रेशन रन अँड पेटॅथॉन’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ५ किलोमीटर, १० किलोमीटर आणि १५ किलोमीटर धावण्याची स्पर्धाही पार पडली. एक मैलाची पेटॅथॉन हे विशेष आकर्षण ठरले. पहाटे ६ वाजता सुरू झालेल्या या स्पर्धेत ७०० हून अधिक स्पर्धकांनी या सहभाग नोंदविला. वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदानात स्पर्धेचा समारोप करण्यात आला. स्पर्धकांचा उत्साह वाढविण्यासाठी बॉलीवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि अभिनेत्री गुल पनाग या वेळी उपस्थित होती.
१५ किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेची सुरुवात सकाळी ६ वाजता एमएमआरडीए मैदानापासून करण्यात आली. त्यापुढे वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयाला वळसा घालत, महाराष्टÑ टेलिफोन निगम लिमिटेड ते वांद्रे कुर्ला संकुलातील मुंबई क्रिकेट असोसिएशनपासून परत एमएमआरडीए मैदानात या स्पर्धेचा शेवट करण्यात आला. सचिन पाटील या स्पर्धकाने ५१ मिनिटे ३३ सेकंदांत ही स्पर्धा जिंकली. या स्पर्धांचे संपूर्ण व्यवस्थापन ‘यूटूकॅनरन’ टीमने केले.
पेटॅथॉन म्हणजे अशी स्पर्धा, ज्यामध्ये पाळीव प्राणी आणि त्याचा मालक दोघांनीही एकत्र धावणे अपेक्षित असते. ही आगळीवेगळी स्पर्धा मुंबईकरांचे आकर्षण ठरली. या स्पर्धेतही मोठ्या संख्येने स्पर्धक सहभागी झाले होते. पाळीव प्राण्यांमध्ये श्वानांची संख्या मोठी होती. या वेळी विविध प्रजातीचे श्वान एकाच वेळी पाहायला मिळाले आणि हे श्वान त्यांच्या मालकांसोबत तब्बल एक मैल पेटॅथॉनमध्ये धावले.
धावणे म्हणजेही क्रिएटिव्हिटी
धावणे ही माझ्यासाठी एक क्रिएटिव्हिटी आहे. मी जेव्हा धावतो, तेव्हा सर्वाधिक आनंदी असतो. सर्व लोकांना अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेता यावा, यासाठी या स्पर्धेचे साई इस्टेट कन्सल्टन्सीतर्फे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन करताना अत्यंत आनंद होत आहे. माझ्याकडेही चार पाळीव प्राणी आहेत. माझ्या त्यांच्यावरील प्रेमामुळे मी पेटॅथॉनचेही आयोजन केले होते.
- अमित वाधवानी, संचालक, साई इस्टेट कन्सल्टन्सी