महामार्गावरील खड्डे तातडीने बुजवा
By admin | Published: August 28, 2016 01:27 AM2016-08-28T01:27:28+5:302016-08-28T01:27:28+5:30
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या टप्प्याची
पनवेल, वडखळ, कार्लेखिंड : राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे व रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश महेता यांनी शनिवारी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते इंदापूर या टप्प्याची पाहणी केली. गणेशोत्सवापूर्वी म्हणजेच ३ सप्टेंबरपर्यंत या टप्प्यातील खड्डे बुजवण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले आहेत. आठ ठेकेदारांवर ही जबाबदारी आहे. डांबरीकरण, काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्याचे काम सुरू आहे. त्याची पाहणी शिंदे यांनी केली.
या वेळी संबंधित विभागाचे सर्व अधिकारी, तसेच रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सुवेझ हक, महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे आणि भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर जैन उपस्थित होते. त्यांनी दुपारपासून पळस्पे ते इंदापूर दरम्यान पाहणी केली. काम चांगल्या पद्धतीने करण्याचा आदेश संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना देण्यात आला. (प्रतिनिधी/वार्ताहर)
पेण : पेण हमरापूर फाटा, रामवाडी रेल्वे क्षेत्र पुढे वडखळपर्यंतचा प्रवास नेहमीच नकोसा वाटावा एवढा बिकट असतो. महामार्गवरील खड्डे बुजवण्याची अंतिम मुदत २५ आॅगस्ट असताना ठेकेदारांनी ती पाळलेली नाही. शनिवारी एकनाथ शिंदे व प्रकाश महेता यांच्या पाहणी दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पेणच्या ‘लिट्ल एन्जल’ इंग्रजी माध्यमाच्या शाळेसमोरील महामार्गाचे तातडीने डांबरीकरण करण्यात आले. त्यासाठी कामगारांची मोठी फौज कार्यरत होती. मात्र मंत्री महोदयांनी थेट जाणे पसंत करून पेणहून वडखळ गाठण्यात धन्यता मानली.
अवजड वाहनांवर ३१ आॅगस्टपासून बंदी
एकनाथ शिंदे यांनी पळस्पे फाटा येथील महामार्ग रुंदीकरणाची पाहणी केली. या वेळी ठेकेदार असलेल्या सुप्रीम व महावीर कंपनीच्या अधिकाऱ्यांना महामार्गाच्या कामामध्ये योग्य पद्धतीने लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या. तसेच ३१ आॅगस्टपासून महामार्गावरून अवजड वाहनांची वाहतूक करण्यास बंदी घालण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास सुकर व्हावा म्हणून महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. तीन किंवा चार सप्टेंबरला पुन्हा एकदा दौरा करण्यात येईल. रुंदीकरण आॅक्टोबरपासून सुरूहोणार आहे. यासाठी निधी मंजूर झाला असून लवकरच मार्ग सुस्थितीत येईल. महामार्गाची दखल थेट पंतप्रधानांनी घेतली आहे. त्यामुळे या कामाला वेग येणार आहे.
- प्रकाश महेता, पालकमंत्री, रायगड