Join us

पनवेलच्या रस्त्यांवर खड्डेच खड्डे

By admin | Published: July 19, 2014 11:41 PM

पनवेल शहरातील सर्व रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे.

पनवेल : पनवेल शहरातील सर्व रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. खड्डय़ांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहनांचे नुकसान होऊ लागले आहे. शहरात अपघातांमध्येही वाढ होऊ लागली असून नागरिकांमध्ये असंतोष निर्माण होवू लागला आहे. 
शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम करण्यात आले आहे. या कामासाठी पूर्ण शहरात खोदकाम करण्यात आले होते. ठेकेदाराने  काम केल्यानंतर रस्त्यांची डागडुजी करणो आवश्यक होते. परंतू  ठेकेदाराने डागडुजी व्यवस्थित केली नाही. परिणामी पहिल्याच पावसात सर्व रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. सर्व प्रमुख रस्त्यावर मोठय़ाप्रमाणात खड्डे पडले आहेत.  
वाहतुकीस अडथळा निर्माण होवू लागला आहे. वाहने अत्यंत धीम्या गतीने चालवावी लागत आहेत. रिक्षा, दुचाकींचे मोठय़ाप्रमाणात नुकसान होवू लागले आहे. वाहने चालवायची कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 
शहरातील टपाल नाका, उरण रोड, गोखले रोड, पायोनीयर सोसायटी, तालुका पोलिस स्टेशन रोड, सहस्त्रबुद्धे हॉल, मुख्य बाजारपेठ,बावन बंगला, अमरधाम,  विरूपाक्ष मंदिर रस्त्यासह सर्व ठिकाणी खड्डय़ांचे साम्राज्य आहे. पावसाच्या सुरवातीस ही स्थिती असेल तर पुढील तीन महिने शहराची स्थिती काय होणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. नगरपालिकेने ठेकेदाराकडून तत्काळ खड्डे भरून घ्यावेत . ठेकेदार खड्डे बुजवत नसेल तर त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात येत आहे. (वार्ताहर)
 
स्वामी नित्यानंद मार्ग गेला कुणीकडे?
गार्डन हॉटेल ते गोखले सभागृहार्पयत रस्त्याला स्वामी नित्यानंद मार्ग असे नाव देण्यात आले आहे. नगरपालिका व बाजारपेठेत जाण्यासाठी हा महत्वाचा मार्ग आहे. मलनि:सारण वाहिन्या टाकण्यासाठी हा रोड मध्यभागी खोदण्यात आला आहे. ठेकेदाराने तकलादू डागडुजी केली होती. परिणामी या रोडच्या मधील भाग खचल्यासारखा दिसत आहे. मॉडर्न स्विटच्या बाजूला तीन फुट आकाराचा खड्डा पडला असून तेथे अपघात होवू लागले आहेत. यामुळे स्वामी नित्यानंद  मार्ग गेला कुठे, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत. 
 
पाऊस जास्त पडल्याने काही रस्त्यांवर खड्डे पडले ही वस्तुस्थिती आहे. मात्र पनवेलकरांची  खड्डय़ांमुळे गैरसोय होवू नये यासाठी आम्ही खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. 
- भगवान खाडे, 
उपमुख्याधिकारी, 
पनवेल नगरपालिका
 
ठोस उपाययोजना हवी 
शहरातील सर्व रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. एकदा खड्डे बुजवून काही उपयोग नाही. पुढील तीन महिने नागरिकांना त्रस होणार नाही यासाठी ठोस उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. खड्डे बुजविण्याच्या कामावरही देखरेख झाली पाहिजे, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.