मुंबई : खड्ड्यांची समस्या दरवर्षीचीच. प्रत्येक पावसाळ्यात मुंबईत हेच चित्र. गेल्या तीन वर्षांत साडेतीन हजार कोटी खर्च झाल्यानंतर मुंबई खड्ड्यातून बाहेर येईल, असे वाटत असताना उघड झालेल्या घोटाळ्याने मुंबईकरांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे तेच तेच रस्ते पुन्हा पुन्हा खड्ड्यात जात आहेत. वारंवार दुरुस्तीमुळे काही रस्त्यांचे ‘स्पीड ब्रेकर’ झाले आहेत. त्यामुळे मतदार नाराज आणि नगरसेवक हवालदिल झाले आहेत. तरीही ठेकेदार मोकाट आणि अभियंत्यांना मात्र अभय मिळाल्याचे चित्र आहे.
रस्त्यांचे काँक्रिटीकरण मुंबईतील खड्ड्यांचा प्रश्न मिटवेल, असा पालिकेचा दावा होता. मात्र ३५२ कोटी रुपयांच्या घोटाळ्याने रस्त्यांची कामे म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचे दाखवून दिले. या घोटाळ्यासाठी जबाबदार ठेकेदार, अभियंता, थर्डपार्टी आॅडिट कंपनी या सर्वांवर कारवाई सुरू आहे. परंतु खड्ड्यातून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांचा त्रास यानंतरही कमी झालेला नाही. गेले दोन दिवस सतत मुसळधार पाऊस असल्याने त्यामध्ये आणखी भर पडली आहे.
दरवर्षी पावसाळ्यात मुंबईकर खड्ड्यांचा जाच सहन करीत आहेत़ याची दखल घेत उच्च न्यायालयाने पालिकेचे कान टोचले. त्या वेळी दोन आठवड्यांत खड्ड्यांवर कायमस्वरूपी तोडगा आणू, अशी ग्वाही पालिकेने दिली़ त्यानुसार नागपूरस्थित कंपनीने चार महिन्यांची गॅरेंटी देत प्रयोगाची तयारी दाखविली़ मात्र प्रयोगाआधीच त्या कंपनीने पळ काढल्यामुळे पालिका तोंडघशी पडली़ त्यानंतर जयपूरस्थित शालिमार, कानपूरस्थित एआर थर्मो आणि आॅस्ट्रियाच्या इको ग्रीन कंपनीने या प्रयोगात भाग घेतला. परंतु या कंपनीने सादर केलेले खर्चाचे अंदाज पालिकेच्या खड्डे बुजविण्याच्या बजेटपेक्षा दहापट अधिक आहेत़ मात्र प्रयोगाची चाचपणी करण्यासाठी आणखी काही कालावधी लागणार आहे़ यावर अंतिम निर्णय स्टॅक समिती घेणार आहे. त्यामुळे आणखी तीन महिने व त्याहून अधिक काळ मुंबईकरांची खड्ड्यातून सुटका नाही. ठेकेदारांचे चांगभलं : के़आऱ कन्स्ट्रक्शन, महावीर इन्फ्रा, आरपीएस, आऱ के़ मदानी, जे़ कुमार, रेलकॉन या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकणे, नोंदणी रद्द करणे व त्यांच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्याची प्रक्रिया पालिकेने पूर्ण केली आहे़ यापैकी तीन ठेकेदारांना अटक व जामीनही मिळाला. आता या ठेकेदारांना नव्याने रस्त्यांचे काम मिळण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी घेतलेली काही कामे अर्धवट असल्याने ती कामे या ठेकेदारांकडून पूर्ण करून घेण्यात येणार आहेत. तसेच आॅक्टोबरपासून हाती घेण्यात येणाऱ्या दोन हजार कोटी रुपयांच्या कामांमध्येही या ठेकेदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. चौकशीचा अंतिम अहवाल अद्याप जाहीर न झाल्यामुळे हे ठेकेदार दोषी असल्याचे सिद्ध झालेले नाही. त्यामुळे त्यांना आधीच बाद करणे शक्य नाही, असा युक्तिवाद अधिकारी करत आहेत. यावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.पश्चिम उपनगर खड्ड्यात : मुसळधार पावसामुळे गेल्या ४८ तासांमध्ये मुंबईत हजारो खड्डे पडले आहेत. जूनपासून सर्वाधिक खड्डे पश्चिम उपनगरामध्ये पडले आहेत. अंधेरी प., विलेपार्ले पश्चिम, मालाड, बोरीवली वॉर्ड खड्ड्यात गेले आहेत. या वॉर्डांमध्ये नागरिकांची दैना उडाली आहे.अधिकाऱ्यांचे मौन२०११ मध्ये पालिकेने आणलेली पॉटहोल ट्रॅकिंग सिस्टीम प्रभावी ठरली होते. या सिस्टीममुळे खड्डे ४८ तासांमध्ये बुजविले गेले नाहीत तर संबंधित अभियंत्यांना जबाबदार धरता येत होते. मात्र यंदा रस्ते घोटाळा उघड झाल्यानंतर त्यात बरेच अभियंते अडकले, मात्र ही कारवाई अयोग्य असल्याचा दावा करीत अभियंता वर्गाने असहकार पुकारण्याची तयारी केली आहे. असे झाल्यास रस्ते विभागात काम करण्यास अभियंता उरणार नाही. म्हणून पालिका प्रशासनाने या वर्षी अभियंत्यांवर दंडात्मक अथवा कोणतीही कारवाई केलेली नाही. याबाबत प्रतिक्रिया घेण्यासाठी आयुक्त अजय मेहता यांच्याशी वारंवार संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नाही. तर रस्ते विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनीही दूरध्वनीला प्रतिसाद दिला नाही.खड्डे गेले वाहून : आजच्या घडीला पालिकेच्या वरळी येथील कार्यशाळेतून तयार केलेले साहित्य खड्ड्यांमध्ये भरण्यात येते. यामध्ये कोल्डमिक्स, डांबराचे मिश्रण खड्ड्यात टाकून रोलरने ती जागा सपाट केली जाते. मात्र हे साहित्य मुसळधार पावसापुढे तसेच मुंबईतील प्रचंड वाहतुकीमुळे तग धरू शकत नाही. मुसळधार पाऊस सतत कोसळत असल्याने हे साहित्य वाहूनही जात आहे.अशा काही खड्ड्यांच्या कथा : दादर येथील गोखले रोडवर एक खड्डा आतापर्यंत २७ वेळा बुजवला आहे. तर भायखळा उड्डाणपुलावरील एक खड्डा एवढ्या वेळा बुजविला की त्या जागी स्पीड ब्रेकर तयार झाला आहे. गिरगाव येथील एसव्हीपी मार्गावर गेल्या महिन्यात पाच वेळा खड्डे बुजवले आहेत.करदात्यांचे पैसे खड्ड्यातदादरमध्येच दोनशेहून अधिक खड्डे आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली असून मुंबईकरांची प्रचंड गैरसोय होत आहे. मात्र खड्डे शोधून ते तत्काळ दुरुस्त करण्यास भाग पाडणारी ट्रॅकिंग सिस्टीम पालिकेने बंद केली. खड्डे बुजविण्याचे काम व्यवस्थित होत नसल्याने करदात्यांचे पैसे खड्ड्यात जात आहेत.- संदीप देशपांडे, गटनेते, मनसेनगरसेवकांनाही जुमानत नाहीतठेकेदार काम करीत नाहीत. याबाबत तक्रार करणाऱ्या नगरसेवकांच्या तक्रारींचीही दखल अधिकारी घेत नाहीत. वॉर्डमध्ये कामे केली जात नाहीत. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष वाढू लागला आहे.- प्रवीण छेडा, विरोधी पक्षनेतेमान्सून संपत आला तरी खड्डेमान्सून संपत आला तरी मुंबई खड्ड्यातून मुक्त झालेली नाही. आहे त्या जागेवर पुन्हा पुन्हा खड्डे पडत आहेत. हा करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असून नुसत्या चौकशा करीत बसण्यापेक्षा उपाय शोधा.