जयंत होवाळ, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: महालक्ष्मी रेसकोर्सवरील सुमारे १२० एकर क्षेत्र व त्यासोबत मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील सुमारे १७५ एकर क्षेत्र असे संपूर्ण मिळून जवळपास ३०० एकर क्षेत्रावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रेसकोर्स भूखंडावरील ९१ एकर भूखंड ३० वर्षांच्या भाडेपट्ट्याने मे. रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेडला देण्याच्या करारावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली. परिणामी १२० एकर जागा मुंबई महापालिकेच्या ताब्यात आली आहे.
रेसकोर्स येथील २११ एकर क्षेत्राचा भूखंड १०० वर्षांपासून टर्फ क्लबला कराराने दिला होता. या जागेचा भाडेपट्टा करार काही वर्षांपूर्वी संपल्यानंतर हा भूखंड नागरी हिताच्या दृष्टीने ताब्यात घेण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू होते. यासाठी विविध कायदेशीर बाबी, वैधानिक आव्हाने आणि प्रशासकीय अडचणी यातून सर्वमान्य होईल असा मार्ग काढणे ही सर्वात आव्हानात्मक बाब होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव तथा तत्कालिन महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल, विद्यमान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी तसेच उपआयुक्त (वित्त) प्रशांत गायकवाड व मालमत्ता विभागाने या विषयाचा सखोल अभ्यास आणि पाठपुरावा करुन सर्वमान्य तोडगा काढण्यात यश मिळविले. परिणामी ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ आता प्रत्यक्षात साकारणे शक्य होणार आहे.रेसकोर्स भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतर एकूण भूखंडापैकी १२० एकर भूखंड सरकारच्या माध्यमातून पालिकेच्या ताब्यात देण्यास सरकारने अलीकडे मान्यता दिली.उर्वरित ९१ एकर भूखंड टर्फ क्लबला भाडेपट्ट्याने देण्यात येणार आहे. हा भाडेपट्टा करार १ जून २०२३ पासून ते ३१ मे २०५३ या ३० वर्षांच्या कालावधीसाठी आहे. 'वर्षा' बंगल्यावर या भाडेपट्टा करारावर शिंदे यांच्या मुख्य उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
रेसकोर्सच्या भूखंडापैकी ९१ एकर क्षेत्र टर्फ क्लबला सुपूर्द केल्यानंतर उर्वरित सुमारे १२० एकर जागा पालिकेच्या ताब्यात आली आहे. ही १२० एकर जागा तसेच रेसकोर्स परिसरामध्ये लागून असलेल्या मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील १७५ एकर जागा असे दोन्ही मिळून जवळपास ३०० एकर जागेवर न्यूयॉर्क, लंडन या शहरांच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून आता वेग दिला जाईल.
टर्फ क्लबडून परत घेण्यात आलेल्या जागेवर कोणत्याही स्वरुपाचे व्यावसायिक / व्यापारी बांधकाम करण्यात येवू नये. या जागेचा वापर सार्वजनिक वापराकरिता, आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंट्रल पब्लिक पार्क विकसित करण्याकरीता करण्यात यावा, असे निर्देश सरकारच्या नगरविकास विभागाने दिले आहेत.
मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख होणार अधिक ठळक
‘मुंबई सेंट्रल पब्लिक पार्क’ विकसित झाल्यामुळे मुंबईची आंतरराष्ट्रीय ओळख अधिक ठळक होईल. मुंबईचे सध्या अस्तित्वात असणारे ३ हजार ९१७ एकर हरित क्षेत्र वाढून ते ४ हजार २१२ एकर इतके होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे एकूण तब्बल ३०० एकरावरील हरित क्षेत्र हे मुंबईच्या पर्यावरण संरक्षण व संवर्धनात मोलाचे योगदान ठरेल.