Join us

धारावी पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; जमीन देण्यास रेल्वेची मान्यता, रेल्वे मंत्रालयाशी करार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 5:42 AM

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती 

नवी दिल्ली : धारावी पुनर्विकासातील रेल्वेच्या जमिनीचे असलेले सर्व अडथळे आता दूर झाले  असून, रेल्वेने जागा राज्य सरकारला देण्यास तत्त्वतः मान्यता दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

हिमाचल प्रदेशसाठी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची निश्चिती करण्यासाठी भाजपच्या  केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी दिल्लीत आलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आज केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली व राज्याचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी या दोन्ही मंत्र्यांशी चर्चा केली.

धारावीच्या पुनर्विकासाचा प्रश्न सुटणार असल्याचे सांगून ते म्हणाले, यामुळे धारावीतील लोकांना त्याच परिसरात वास्तव्य करणे शक्य होणार आहे. ही जागा टप्प्याटप्प्याने विकसित करण्यात येईल. येथे धारावीतील लोकांचे पुनर्वसन केले जाईल. पुनर्विकासासाठी निविदा काढल्या असून, २५ वर्षांपासूनचे स्वप्न साकार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, नागपूर-मुंबई या समृद्धी महामार्गावर हायस्पीड रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावालाही मान्यता मिळाली. समृद्धीसाठी संपादित जमिनीचा वापर केला जाणार आहे. केवळ ३२ टक्के जमीन संपादन करावी लागणार आहे. डीपीआर व कार्गो रेल्वे सुरू करण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. 

मुंबई - सोलापूर वंदेमातरम् एक्स्प्रेस मुंबई ते सोलापूरदरम्यान वंदेमातरम् एक्स्प्रेस सुरू करण्याच्या प्रस्तावाला रेल्वेमंत्र्यांनी मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.  त्याचसोबत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेऐवजी ‘रेल कम रोड’ अशी योजना राबवली जाईल. त्या प्रस्तावाला गती मिळेल.

मुंबईतील एअर इंडियाची इमारत सरकार घेणारमुंबईत मंत्रालयाजवळ असलेली एअर इंडियाच्या मालकीची इमारत राज्य सरकार घेणार आहे. मंत्रालयात जागा कमी पडत असल्याने मंत्रालयाच्या जवळ असलेली ही इमारत घेणे आवश्यक होते. यासाठी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी तत्त्वतः मान्यता दिल्याचे त्यांनी सांगितले.

समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान कार्यालयाशी संपर्कनागपूर - मुंबई समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासंदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला असून, त्याबाबत लवकरच वेळ मिळेल, असेही फडणवीस यांनी सांगितले. 

नागपूर स्टेशनसाठी ४७२ कोटींचे कार्यादेश नागपूर रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास करण्यासाठी ४७२ कोटींचे कार्यादेश केंद्र सरकारने काढल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी कार्यादेशाची प्रत दिल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना मदत पोहोचलीअतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत केली आहे. गेल्या आठ दिवसात जी अतिवृष्टी झाली आहे. या नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ मदत देण्याचे निर्देश दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

काँग्रेसची विरोधक जोडो यात्राभारत जोडो यात्रेत शरद पवार व उद्धव ठाकरे सहभागी होणार असल्याचे निदर्शनात आणून दिल्यानंतर ते म्हणाले, काँग्रेसची भारत जोडो यात्रा नसून विरोधक जोडो यात्रा आहे.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसरेल्वेपंतप्रधान