Join us

विक्रोळीतील महात्मा फुले रुग्णालयाच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

By जयंत होवाळ | Published: January 16, 2024 6:49 PM

विक्रोळीकरांच्या लोकलढ्याला यश

मुंबई : २०१८ सालापासून  बंद पडलेल्या   विक्रोळी येथील महात्मा ज्योतिबा  फुले  रुग्णालयाचा  पुनर्विकास व्हावा यासाठी विक्रोळीकरांनी दिलेल्या लोकलढ्याला अखेर यश आले आहे. या रुग्णालयाचा पुनर्विकास करण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे  येत्या काही वर्षात विक्रोळी आणि परिसरातील नागरिकांना १३  मजल्यांचे सुसज्ज रुग्णालय  मिळणार आहे. २०२८ पर्यन्त नवे  रुग्णालय उभे राहील अशी अपेक्षा  आहे. मात्र तोपर्यंत या भागातील लोकांना पर्यायी रुग्णालय देण्यास पालिकेला अपयश आले आहे. 

इमारत धोकादायक बनल्यामुळे   २०१८ सालापासून हे रुग्णालय हळूहळू बंद पडत गेले. फक्त 'ओपीडी' सेवा, तीही कंटेनर मध्ये सुरू होती. या रुग्णालयामुळे लोकांना उपचारासाठी अन्य रुग्णालयात जाण्याची गरज भासत नव्हती. मात्र रुग्णालय बंद पडल्याने लोक आरोग्य सेवेपासून वंचित होते. रुग्णालयाचा पुनर्विकास व्हावा, या मागणीसाठी ' आम्ही विक्रोळीकर' संघटनेने वेळोवेळी आंदोलने केली होती. सामाजिक कार्यकर्ते मिलिंद परब आमरण उपोषणास बसले होते. या सर्वांच्या सामूहिक लढ्याला  यश आले आहे. पुनर्विकासाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत गेला होता.   पुनर्विकासासाठी रुग्णालया शेजारचा भूखंड विनामोबदला पालिकेला देण्याचे निर्देश  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. त्यानंतर म्हाडाने पालिकेला  जमिनीचे ऑफर लेटर देताना १३  कोटी रुपयांचा भरणा  करण्यास सांगितले होते. परंतु पैसे भरण्यास पालिकेचा नकार होता. त्यामुळे म्हाडा आणि पालिका या दोन यंत्रणा यांच्यातील वादात पुनर्विकास रखडला होता. अखेर पालिकेने म्हाडाला  रक्कम  अदा केली. त्यामुळे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु निविदा प्रक्रिया काही सुरू होत नव्हती. मात्र आता काम मार्गी लागले आहे. 

असे असेल नवीन रुग्णालय 

५०० खाटांचे सुसज्ज रुग्णालय. तळमजला, तळघर अधिक १३ मजल्यांची इमारत डॉक्टर आणि परिचारिकांसाठी २१ मजल्यांची निवासी इमारत ५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित

टॅग्स :मुंबई