Join us

वैमानिकाचा अनुभव कमी असल्यानेच पवनहंस दुर्घटना; शोध समितीने ठेवला ठपका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 8:57 AM

हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले त्यावेळी काहींची लाइफ जॅकेट उघडलीच नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पवन हंस हेलिकॉप्टरने गेल्या वर्षी ओएनजीसी येथे जाणाऱ्या चार प्रवाशांच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक बाब समोर आली असून, हेलिकॉप्टरच्या दोन्ही वैमानिकांचा अनुभव कमी असल्याने त्यांना आपत्कालीन स्थिती हाताळण्यात अपयश आल्याचा ठपका विमान दुर्घटना शोध समितीने ठेवला आहे.

गेल्या जूनमध्ये मुंबईनजीक अरबी समुद्रात असलेल्या ओएनजीसीच्या प्रकल्पात कर्मचाऱ्यांना घेऊन जाणारे विमान समुद्रात कोसळले होते. त्या प्रकरणाची चौकशी शोध समितीने केली. ८९ पानी अहवालात अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर बोट ठेवण्यात आले आहे. हे हेलिकॉप्टर सिकोस्क्री बनावटीचे होते. त्याच्या वैमानिकापैकी मुख्य वैमानिकाला या बनावटीचे हेलिकॉप्टर चालविण्याचा केवळ २० तासांचा अनुभव होता. तर, सहायक वैमानिकाला केवळ चार तासांचा अनुभव होता. या सेवांमध्ये विमान, हेलिकॉप्टर चालविण्याचा संबंधित वैमानिकाला किती तासांचा अनुभव आहे, याला अनन्यसाधारण महत्त्व असते.

या हेलिकॉप्टरमधील तंत्रसुविधा यांचीदेखील या वैमानिकांना पुरेशी माहिती नव्हती. जेव्हा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, त्यावेळी ते वैमानिक ती परिस्थिती नीट हाताळू शकले नाहीत. या हेलिकॉप्टरसाठी पवन हंसने अनुभवी वैमानिकांची भरती करण्याचे आश्वासन वारंवार दिले होते. मात्र, त्याची पूर्तता न केल्याचा ठपकादेखील ठेवण्यात आला आहे.

लाइफ जॅकेट उघडलीच नाहीत

ज्यावेळी हेलिकॉप्टर समुद्रात कोसळले त्यावेळी त्यात असलेल्या नऊ जणांपैकी पाच जणांची लाइफ जॅकेट उघडलीच गेली नाहीत. आपत्कालीन स्थितीमध्ये ही जॅकेट कशी वापरायची असतात, त्याची योग्य माहितीदेखील त्यांना देण्यात आली नव्हती. तसेच लाइफ जॅकेट कसे वापरावे, यासंदर्भात हेलिकॉप्टरमध्ये जी पुस्तिका होती त्यातदेखील अपुरी माहिती होती, असा उल्लेख आहे. हे हेलिकॉप्टर जेव्हा समुद्रात कोसळले, तेव्हा वैमानिक, सहवैमानिक आणि अन्य दोघांची लाइफ जॅकेट व्यवस्थित उघडल्यामुळे त्यांचा जीव वाचला. मात्र, उर्वरित पाच जणांची लाइफ जॅकेट उघडली नाहीत. या पाचांपैकी एकाला मात्र वाचविण्यात यश आले. मात्र, अन्य चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.

टॅग्स :हेलिकॉप्टर दुर्घटनामुंबई