मुंबई : मराठवाड्यातील काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणातील आरोपी पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार बनला आहे. केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेच्या विशेष न्यायालयाने त्याबाबत दिलेल्या अर्जाला नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे १३ वर्षांपूर्वी घडलेल्या या खटल्याला कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याच्या जबाबातून दुहेरी खुनाचे नेमके कृत्य, कट समोर येणार आहे.
राजकीय वैमनस्यातून निंबाळकर व त्यांचा वाहनचालक समद काझी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करून विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. या खटल्यात पारस जैन याने माफीचा साक्षीदार बनण्याबाबत ४ डिसेंबरला सीबीआयच्या विशेष न्यायालयात अर्ज दिला होता. त्याबाबत उभय पक्षाकडून सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने २० डिसेंबरला जैन याचा अर्ज मंजूर केला आहे. या खटल्यात समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह १२७ जणांच्या साक्षी झाल्या आहेत. चौथ्या क्रमांकाचा आरोपी असलेला जैन हा आता १२८ क्रमांकाचा साक्षीदार बनला आहे. त्याच्यासह दिनेश तिवारी, पिंटू सिंग हे अद्यापही कारागृहात आहेत तर माजी मंत्री पद्मसिंह पाटील, सतीश मंदाडे, मोहन शुक्ला, छोटू पांडे, कैलास यादव व शशिकांत कुलकर्णी हे जामिनावर बाहेर आहेत.राजकीय वैमनस्यातून हत्यातत्कालीन कॉँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर यांच्याशी राजकीय वैमनस्य असलेल्या पद्मसिंह पाटील यांनी त्यांची सुपारी देऊन ३ जून २००६ रोजी हत्या केली होती. निंबाळकर हे मुंबईहून उस्मानाबादकडे जात असताना नवी मुंबईतील कळंबोली येथे त्यांची मोटार अडवून हे कृत्य करण्यात आले होते. त्यामध्ये चालक समद काझी याचाही मृत्यू झाला होता. या प्रकरणात त्यांच्या पत्नी आनंदीदेवी निंबाळकर या फिर्यादी आहेत.