मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या लंडनला गेले आहेत. ते 5 सप्टेंबरला भारतात परतणार आहेत. तोवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागावाटपाची कुठलीही चर्चा होण्याची शक्यता नाही, असेही सूत्रंनी सांगितले.
आम्हाला 144 जागा हव्या आहेत आणि आम्ही तसा प्रस्ताव काँग्रेसला दिला आहे. आता निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. आम्ही काँग्रेसच्या प्रतिसादाची आणखी चार दिवस वाट पाहू. स्वबळाची तयारी आम्ही आधीच सुरू केलेली आहे, असा इशारा राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने मंगळवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे म्हणाले की, आघाडी सन्मानपूर्वकच झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने व्यावहारिक प्रस्ताव दिला पाहिजे. 144 जागांचा प्रस्ताव मान्य करता येणार नाही, असे ते म्हणाले. जागावाटपाचा तिढा राज्यात नव्हे तर दोन्ही पक्षांच्या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींमधील चर्चेद्वारे सुटावयाचा आहे, असेही ते म्हणाले.
प्रचाराचा प्रारंभ 6 ला
विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या प्रचाराचा प्रारंभ 6 सप्टेंबर रोजी येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात होणार आहे. शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत होणा:या या कार्यक्रमास माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह पक्षाचे सर्व मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित राहतील. त्यापूर्वी पक्षाच्या सर्व आघाडय़ांतर्फे महापुरुषांच्या पुतळयांना अभिवादन करून समतेची दिंडी तटकरे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम स्थळी नेण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
युतीचे पाहून आघाडीचे ठरवू : मुख्यमंत्री
आधी भाजपा-शिवसेना युतीचे काय होते ते पाहू आणि नंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय घेऊ, असे विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केले. काँग्रेसची लढत राष्ट्रवादीशी होणार की भाजपा-शिवसेनेशी? या पत्रकारांच्या प्रश्नात ते म्हणाले की, आधी युतीचे काय होते ते पाहून ठरवू. नंतर मुख्यमंत्र्यांनी सारवासारव केली की आमची आघाडी होईल आणि योग्यवेळी त्याबाबत आम्ही सांगू.