मोदींच्या 'त्या' निर्णयाचे पवारांकडून कौतुक, इंद्रायणीकाठी सांगितली आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 03:45 PM2020-02-08T15:45:59+5:302020-02-08T15:47:33+5:30
कीर्तन परंपरेला आकार देण्यासाठी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना
मुंबई - आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जबाबदारी घेतली. तसेच इंद्रायणी स्वच्छतेचे पवार घराण्याचे कर्तव्य असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे येणाऱ्या काळात इंद्रायणी नदी स्वच्छ होणार असं दिसत आहे. यासोबतच, पवार यांनी उत्तर प्रदेशमधील काशी येथील घाटाच्या स्वच्छतेच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. आमचे आणि त्यांचे वैचारिक मतभेद असले तरी, त्यांनी घेतलेला निर्णय चांगला असल्याचे पवार यांनी म्हटले आहे.
कीर्तन परंपरेला आकार देण्यासाठी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या विष्णुपंत जोग महाराजांच्या शतकोत्तर पुण्यस्मरण सोहळ्यात ते बोलत होते. इंद्रायणी शुद्धी करण्याची मागणी होत असून मला लक्ष घालण्यास विनंती करण्यात येत आहे. मी मंत्री वगैरे नाही. तरी समाजासाठीची मागणी असल्यामुळे ही पूर्ण होईल, असं पवार म्हणाले. तुम्ही स्वत:साठी काहीही मागत नाही. समाजासाठीची मागणी पूर्ण होणार नसेल तर सरकार काय कामाचे असंही पवार यांनी म्हटले. तसेच, काशी विश्वनाथ येथील अनुभव कथन करताना मोदींच्या निर्णयाचे कौतुक व स्वागतही केले.
एकदा काशीतल्या घाटावर अर्धवट जळालेली प्रेतं पाहिली. देशातील कानाकोपऱ्यांतून जनता तिथे श्रद्धेपोटी येते. पंतप्रधानांनी तो घाट स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. हे तिथे घडलं असेल तर इथे घडून आणण्याची काळजी आपण घेतली पाहिजे. pic.twitter.com/L3xVLHNQMj
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 8, 2020
इंद्रायणी शुद्धिकरणाची मागणी आली आहे. जो वर्ग समाजाच्या हितासाठी मागणी करतो त्याच्या मागे सरकार उभे नाही राहिले तर असे सरकार काय कामाचे? त्यामुळे याची पूर्तता ही नक्कीच होईल. हे आश्वासन नाही तर हे कर्तव्य आहे. ही पूर्तता करण्याची जबाबदारी माझी आहे. एकदा काशीला गेलो असताना तिथल्या घाटात अर्धवट जळालेली प्रेत पाहिली. देशातील कानाकोपऱ्यांतून जनता तिथे श्रद्धेपोटी येते. देशाच्या पंतप्रधानांनी तो घाट स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला, याचा मला आनंद आहे. आमचे वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. हे तिथे घडलं असेल ते इथे घडून आणण्याची काळजी आपण घेतली पाहिजे, असेही पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले. तसेच, आपल्या फेसबुक पोस्टवरुनही पवार यांनी इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेची जबाबदारी सांगताना, काशीच्या घाटाचा उल्लेख केला आहे.