"पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, फुरसत मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:51 PM2021-03-30T12:51:43+5:302021-03-30T13:41:37+5:30

राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल भाईदास पाटील आणि अमळनेर बाजार समीतीच्या प्रशासक श्रीमती तिलोत्तमा पाटील यांनी शेतकऱ्यांना अनुदान मिळू देण्यात विरोध केला आहे

"Pawar Saheb, remove the ministers working against the farmers, if you get a chance, pay attention to us too.", farmer letter to sharad pawar for onion | "पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, फुरसत मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या"

"पवार साहेब, शेतकरी विरोधात काम करणाऱ्या मंत्र्यांना हटवा, फुरसत मिळाल्यास आमच्याकडेही लक्ष द्या"

Next

मुंबई/जळगाव - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना जाणता राजा म्हटले जाते, शेतकऱ्यांसाठी दिवस-रात्र झटणारा एकमेव नेता म्हणूनही शरद पवार यांचा देशात नावलौकिक आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही स्थानिक नेतेमंडळीची शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवत नसून शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात चालढकलपणा करत असल्याची तक्रार एका शेतकऱ्याने आणि जळगाव जागृत जनमंचच्या पदाधिकाऱ्याने केलीय. शरद पवार यांना पत्र लिहून कांदा उत्पादक शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूकच त्यांनी आपल्या पत्रात मांडली आहे. विशेष म्हणजे ही पिळवणूक करण्यास राष्ट्रवादीचे नेते, मंत्रीच जबाबदार असल्याचं सांगताना मंत्रीमहोदयांना अधिकाऱ्यांकडून हफ्ता जातो की काय, असा सवालही त्यांनी विचारलाय. तसेच, या मंत्र्यांना पदावरुन हटविण्याची मागणीही पाटील यांनी केलीय. 

आपणास खेदाने कळवू इच्छितो की, आपण शेतकरी हिताबाबत बोलत असतात. मात्र, आपले आमदार आणि मंत्री हे शेतकरी विरोधात काम करीत आहेत, असाच आमचा अनुभव आहे. कांद्याचे भाव पडल्याने तत्कालीन महाराष्ट्र सरकारने १ नोव्हेंबर २०१८ ते २८ फेब्रुवारी २०१९ पर्यंत विकलेल्या कांद्यासाठी शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रूपये अनुदान जाहीर केले. त्याकाळात अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत ४,५३१ शेतकऱ्यांनी कांदा विकला. त्याची यादी बाजार समीतीचे सचिव उमेश राठोड यांनी ऑडिटर, सहनिबंधक व सचिव या त्रीस्तरीय समितीकडे सादर केली. मात्र, अमळनेर कृषी बाजार समिती व राज्य सरकारमध्ये सत्तांतर झाले. राष्ट्रवादीचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्याकडे सत्ता आली. मात्र, एकाही शेतकऱ्याला त्यांनी अनुदान मिळू दिले नाही. हे खोटे शेतकरी आहेत, यात व्यापारी आहेत, यातील फक्त २०% पावती खरी आहे, अर्ज उशीरा आले अशा खोट्या सबबी सांगून शेतकऱ्यांना अनुदान नाकारले, अशी तक्रार शेतकरी शिवराम पाटील यांनी केलीय. 
 


राष्ट्रवादीचे नेते आमदार अनिल भाईदास पाटील आणि अमळनेर बाजार समीतीच्या प्रशासक श्रीमती तिलोत्तमा पाटील यांनी शेतकऱ्यांना अनुदान मिळू देण्यात विरोध केला आहे. यासंदर्भात जळगाव लोकसभा उमेदवार तथा माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वरलाल जैन, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रत्यक्ष भेटून  निवेदन दिले. विषयही समजावून सांगितला, पण ते शेतकरी हिताच्या मानसिकतेत आढळून आले नाहीत, असा आरोपही पाटील यांनी आपल्या पत्रात केलाय. जळगावचे डिडीआर संतोष बिडवई यांच्याकडे तक्रार केली असता, त्यांनीही कामचुकारी केली. विशेष म्हणजे या कामासाठी मला पगार मिळत नसल्याचे त्यांनी म्हटले. आपले राष्ट्रवादीचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांची भेट घेण्यासाठी मुंबई येथे त्यांच्या सरकारी बंगल्यावर थांबलो असता, ते रात्री ९.३० पर्यंत विधानसभेत असल्याचे सांगण्यात आले. 
     
सहकार खात्यातील सचिव देशपांडे हे एकमेव आधिकारीने मंत्रालयात बोलवून विषय समजून घेतला. तेथूनच जळगाव चे कामचुकार डिडीआर संतोष बिडवई यांना सुचना दिल्या की, पात्र शेतकऱ्यांना कांदा अनुदान देण्यात यावे. शिवराम पाटील यांचे तक्रारीवरुन कागदपत्रांची पुन्हा चौकशी करण्यात यावी. मात्र, १५ दिवस होऊनही डिडीआर बिडवई यांनी काहीही काम केले नाही. कदाचित तेच मंत्र्यांसाठी लाच, कमीशन जमा करत असल्याने सचिव देशपांडे यांना जुमानत नसावेत, असा आरोपच पाटील यांनी आपल्या पत्रात केला आहे. एकीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटींच्या वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप लागला असताना, आता सहकारमंत्र्यांवरही एका शेतकऱ्याने वसुलीचा आरोप केला आहे. बाळासाहेब पाटील यांचेकडे सहकार व पणन खाते का सोपवले असावे, हा गंभीर आणि संशयास्पद प्रश्न आहे. आधीच सहकारी खाते भ्रष्टाचाराने बरबरटलेले असून पणन खाते सुद्धा शेतकऱ्यांचे शोषण करण्यासाठीच असावे का? असा प्रश्न पाटील यांनी विचारलाय. 
     
शरद पवार यांनी स्वतः या विषयाकडे जातीने लक्ष घालावे. कामचोर डिडीआर बिडवई यांची अन्यत्र गडचिरोली वगैरे जिल्ह्यात बदली करावी. तिलोत्तमा पाटील यांना अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समीतीचे प्रशासक पदावरून हटविण्यात यावे. सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील हे मंत्रीपदास लायक नसून कामचुकार आहेत. त्यामुळे, त्यांचे मंत्रीपद काढून रात्री ९.३० पर्यंत विधानसभा चालवण्यास मोकळे करावे, असा खोचक टोलाही त्यांनी लगावलाय. पवार साहेब, आपण शेतकरी हितासाठी दक्ष असाल, त्यामुळेच हे मंत्री नेमलेले असतील तर ताबडतोब आदेश द्यावेत, न दिले तर पुन्हा आपणाकडे अर्ज विनंती करण्याची इच्छा होणार नाही. कामचुकार आधिकारी, भ्रष्ट व लांचखोर मंत्री बाळगल्याने राष्ट्रवादीची प्रतिमा मलिन होत आहे. वाझे, ठाकरे, देशमुख आणि परमबीरसींग या घृणास्पद विषयातून वेळ मिळाला तर शेतकरी हिताकडे लक्ष द्यावे. सत्तेवर आला आहात तर त्याचा आम्हा शेतकऱ्यांना काय उपयोग?, असा पोटतिडकीने सवाल पाटी यांनी केलाय.

Web Title: "Pawar Saheb, remove the ministers working against the farmers, if you get a chance, pay attention to us too.", farmer letter to sharad pawar for onion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.