गौरीशंकर घाळेमुंबई : शिक्षण खात्यात काहीही नवीन करायला निघालात की शिक्षक संघटना चार गोष्टी ऐकवायला सुरुवात करतात. मंत्रिपदामुळे त्यांना उत्तर द्यायला अनेकदा मर्यादाही येतात. त्यामुळे त्यांची चिंता करायची नाही, शांत डोक्याने काम करत राहायचे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचा गृहपाठच घेतला. शिवाय, तुम्ही ज्या पद्धतीने काम करताय ते पाहता तुम्हाला नक्की यश मिळेल याबद्दल माझ्या मनात शंका नाही, अशी कौतुकाची थाप देण्यासही पवार विसरले नाहीत.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘प्रथम’ या स्वयंसेवी संस्थेचा शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या वेळी व्यासपीठावर शरद पवार यांच्यासह तावडे, ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहेमान, प्रथमच्या फरीदा लांबे आदी उपस्थित होते. कोणताही निर्णय घेतला की, शिक्षक संघटनांकडून जोरदार अपप्रचार चालविला जातो. वस्तुस्थितीची माहिती न घेताच छात्रभारतीसारख्या संघटना विरोधाची भूमिका घेतात, अशी खंत विनोद तावडे यांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्यात प्रदीर्घकाळ मंत्रिपदाचा अनुभव असणाºया शरद पवार यांनी हाच धागा पकडत तावडेंना अनुभवाचे बोल सांगितले.>आयोगाच्या ‘त्या’ नोटिसीने आनंदच१३०० शाळांबाबत राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने पाठविलेल्या नोटिसीने आनंदच झाल्याचे विधान तावडे यांनी केले आहे. वस्तुस्थिती समजून न घेता काही संघटना अपुºया माहितीवर अपप्रचार करत आहेत. या नोटिसीच्या निमित्ताने सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचे पटवून देता येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शिक्षणाचा स्तर उंचावण्यासाठी या निर्णयामुळे फायदाच होणार असल्याचा दावाही तावडे यांनी केला. मीसुद्धा राज्यात शिक्षणमंत्री होतो. आर्थिक कारणांमुळे शिक्षक संघटनांच्या अनेक मागण्या मान्य करणे शक्य नसायचे. तशी कल्पना दिली तरी वर्गातल्या ‘ढ’ विद्यार्थ्याला जसे सतत समजवतात तसे ही शिक्षक मंडळी वारंवार आपल्या मागण्यांसाठी समजवत राहायची. या अनुभवामुळेच मी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सांगून या खात्यातून माझी सुटका करून घेतली होती, असा अनुभव शरद पवारांनी सांगताच सभागृहात हशा पिकला. शिक्षण खात्याने १३०० शाळा बंद करण्याचा जो निर्णय घेतला त्याबाबत मी सविस्तर माहिती घेईन. तो निर्णय योग्य असेल तर ते योग्य असल्याचे लोकांना सांगण्याबाबतची भूमिका घेता येईल, असेही पवार यांनी या वेळी स्पष्ट केले.
शरद पवारांनी घेतला तावडेंचा गृहपाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 5:29 AM