पवारांच्या घराची चौघांनी केली होती रेकी, हल्ल्याचा गनिमी कावा, चार दिवसांपूर्वीच दिला होता अलर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 07:28 AM2022-04-10T07:28:01+5:302022-04-10T07:30:25+5:30
Attack on Sharad Pawar House: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवास्थानाबाहेर हल्ला करण्यासाठी चार आंदोलकांनी दोन दिवसांपूर्वी या परिसराची रेकी केली होती. याबाबत चार दिवसांपूर्वीच आझाद मैदान पोलिसांनी संबंधित गावदेवी पोलिसांना अलर्ट दिला होता.
- मनीषा म्हात्रे
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील निवास्थानाबाहेर हल्ला करण्यासाठी चार आंदोलकांनी दोन दिवसांपूर्वी या परिसराची रेकी केली होती. याबाबत चार दिवसांपूर्वीच आझाद मैदान पोलिसांनी संबंधित गावदेवी पोलिसांना अलर्ट दिला होता. मात्र, त्याकडे गांभीर्याने न पाहिल्याने हा हल्ला झाल्याची माहिती समोर येत आहे. रेकी करणाऱ्या या चौघांनाही शुक्रवारी मध्यरात्री आझाद मैदान येथून अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी सकाळपासून पाणी, खाद्य वस्तू, पान, विडी, तर कुणी शौचालयाच्या निमित्ताने एक-एक कर्मचारी आंदोलनस्थळाहून बाहेर पडण्यास सुरुवात केली. आझाद मैदानात सुमारे ४०० कर्मचारी बसून असल्याने पोलिसांनीही त्याच्याकडे विशेष लक्ष दिले नाही. मैदानातून बाहेर पडल्यानंतर ठरल्याप्रमाणे कोणालाही संशय येऊ नये म्हणून काहींनी चालत, काहींनी टॅॅक्सी, बस अशी वाहने पकडून गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भुलाभाई देसाई रोड येथील शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानाजवळील उद्यान गाठले.
तेथेच दुपारी ३.३० च्या सुमारास एकत्र येत त्यांनी पुढे हातातून आणलेले दगड, पायातील चपला भिरकावत सिल्व्हर ओकच्या दिशेने कूच केली.
अशाप्रकारचे आंदोलन होऊ शकते याची कुणकुण तेथील बिट मार्शलला लागली होती. यापैकीच एका बीट मार्शलने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी याबाबत चार दिवसांपूर्वीच वरिष्ठांना कळवले होते. मात्र, त्यादृष्टीने योग्य तो बंदोबस्त तैनात केला नाही आणि अचानक आलेला हा जमाव रोखणे तुटपुंज्या पोलिसांना जमले नाही. वेळीच बंदोबस्त तैनात केला असता तर हा हल्ला रोखता आला असता. त्यामुळे धारावी आंदोलनानंतर पोलिसांचे हे दुसरे अपयश आहे.
पोलीस हवालदार सतीश पांडव (४५) यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. उच्च न्यायालयाने याप्रकरणात निकाल जाहीर केल्यानंतर ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी ७ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या घरात घुसून जाब विचारू, असा इशारा दिला होता.