मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर पवारांचे कार्यक्रम रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:09 AM2021-02-23T04:09:33+5:302021-02-23T04:09:33+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन जनतेला संबोधित करताना केले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक सतर्कता बाळगण्याचे आवाहन जनतेला संबोधित करताना केले होते. त्यांच्या या आवाहनानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत, असे शरद पवार यांनी यासंदर्भातील टि्वटमध्ये म्हटले आहे. तर, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी पुढील दहा दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले.
‘कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मी जबाबदार’ या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुंबई काँग्रेसचे २७ तारखेचा मराठी भाषा दिवस, २४ व २८ तारीख पदयात्रा, तसेच पुढील १० दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. महाराष्ट्र शासनाने कोरोना युद्धाकरिता दिलेल्या सूचनांचे पालन करावे व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी,' असे आवाहनही जगताप यांनी केले आहे.
एकीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते आपापले कार्यक्रम रद्द करत असतानाच मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मात्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सावधान, सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचे नाव ‘विधिमंडळ अधिवेशन कोरोना’ असे आहे, जो शरीरावर कमी पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो, असे टि्वट करतानाच या टि्वटनंतर अनेक ‘मा.वि.आ.’ समर्थक मला ट्रोल करतील, पण जे सत्य आहे ते बोलणारच, अशी तळटीपही संदीप देशपांडे यांनी दिली.
..............................