वांद्र्याचे सिनियर, बारामतीच्या ज्युनियरवर पवारांचा माझ्या खांद्यावरून निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2020 06:01 AM2020-06-12T06:01:50+5:302020-06-12T06:02:27+5:30

देवेंद्र फडणवीस यांचा टोला : राज्याच्या सत्ता सर्कशीत आता जोकर हवेत

Pawar's target from my shoulder on Bandra's senior, Baramati's junior | वांद्र्याचे सिनियर, बारामतीच्या ज्युनियरवर पवारांचा माझ्या खांद्यावरून निशाणा

वांद्र्याचे सिनियर, बारामतीच्या ज्युनियरवर पवारांचा माझ्या खांद्यावरून निशाणा

Next

बोर्ली पंचतन/ श्रीवर्धन : मी विदर्भातील आहे. त्यामुळे चक्रीवादळग्रस्तांच्या निमित्ताने मी जर समुद्र पाहायला येत असेन, तर बारामतीतही मी कधी समुद्र पाहिलेला नाही, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना लगावला. माझ्या खांद्यावरून पवारांना वांद्र्याचे सिनियर आणि बारामतीचे ज्युनियर यांच्यावर बंदूक चालवायची आहे, अशी मल्लीनाथीही त्यांनी केली.

रायगड जिल्ह्यातील चक्रीवादळग्रस्तांच्या नुकसानीची पाहणी केल्यावर ते बोलत होते. महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरू असल्याची टीका केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती. तिचा समाचार घेताना पवार यांनी या सर्कशीला शोभा आणण्यासाठी विदूषकांची कमतरता असल्याचा चिमटा काढला होता. त्यावर फडणवीस यांनी राज्याच्या सत्तेत जोकर नसल्याचे माहीत असल्यानेच राजनाथ सिंह यांनी तिला सर्कस म्हटल्याचा दावाही केला. पवार माझ्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यामुळे मुलगा कितीही पुढे गेला, तरी त्याला कमी समजते असेच वडिलांना वाटत असल्याचे उत्तरही त्यांनी पवार यांच्या टीकेला दिले.

पॅकेजमध्ये सुधारणेची गरज
राज्य सरकारने चक्रीवादळग्रस्तांना जाहीर केलेल्या १०० कोटींच्या मदतीपैकी काहीही हाती न पडल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पॅकेजमध्ये सुधारणा करून हेक्टरी मदतीऐवजी झाडांनुसार मदतीची गरज असल्याचे फडणवीस म्हणाले. कोल्हापूर-सांगलीच्या पूरग्रस्तांप्रमाणे स्टॉलधारकांना नुकसानभरपाई द्यावी, पर्यटन व्यवसाय सुरू करण्यासाठी पॅकेज द्यावे, मच्छीमारांनाही मदत करावी, अशा मागण्याही त्यांनी केल्या. यासाठी केंद्र सरकारकडून आलेला एसडीआरएफचा निधी वापरावा, अशी सूचना त्यांनी केली.
श्रीवर्धन तालुक्यात फडणवीस यांनी दिघी, दिवेआगर, भरडखोल, मुळगाव कोळीवाडा, जीवना बंदर येथे भेट दिली. निगडी गौळवाडी येथे घराची भिंत अंगावर पडून मृत्यू झालेल्या अमर पंढरीनाथ जावळे या तरुणाच्या नातेवाइकांची भेट घेऊन सांत्वन केले.
या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार निरंजन डावखरे, आमदार महेश बालदी, माजी आमदार श्याम सावंत, दक्षिण जिल्हा प्रमुख अ‍ॅड. महेश मोहिते आदी उपस्थित होते.

आप्पासाहेब धर्माधिकारी यांची भेट
देवेंद्र फडणवीस यांनी दौऱ्याला सुरुवात करताना ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची चौल-पिरांचे देऊळ भागातील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या वेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर उपस्थित होते. त्यानंतर चौल परिसराची पाहणी केली.

ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याशी चर्चा करताना देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर.

Web Title: Pawar's target from my shoulder on Bandra's senior, Baramati's junior

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.