१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 05:21 IST2025-04-17T05:20:21+5:302025-04-17T05:21:15+5:30

Mumbai University News: विद्यापीठाशी जवळपास ९४२ महाविद्यालये संलग्न आहेत. संलग्नतेसाठी ही महाविद्यालये विद्यापीठाला ठरावीक शुल्क देतात.

Pay 17 crore GST; Notice to university, tax on college affiliation fee; Students in trouble? | १७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?

१७ कोटी जीएसटी भरा; विद्यापीठाला नोटीस, महाविद्यालय संलग्नता शुल्कावर करआकारणी; भुर्दंड विद्यार्थ्यांना?

-अमर शैला 
मुंबई : मुंबई विद्यापीठाला १६ कोटी ९० लाख रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) भरण्याची नोटीस आली आहे. विद्यापीठाला २०१७ पासूनचा जीएसटी भरण्यासाठी केंद्रीय जीएसटी विभागाने ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता सरकारी विद्यापीठांनाही त्यांच्या उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला जीएसटीच्या रूपात द्यावा लागणार असून, त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर पडणार आहे. 

विद्यापीठाशी जवळपास ९४२ महाविद्यालये संलग्न आहेत. संलग्नतेसाठी ही महाविद्यालये विद्यापीठाला ठरावीक शुल्क देतात. विद्यापीठाच्या उत्पन्नात या शुल्काचा मोठा वाटा असतो.  मात्र, या शुल्कावर आता विद्यापीठाला जीएसटी भरावा लागणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. 

जीएसटी विभागाने केंद्रीय जीएसटी कायद्यानुसार विद्यापीठाकडे २०१७ पासूनचा १६ कोटी ९० लाख रुपयांचा जीएसटी आणि त्यावरील दंड भरण्यास सांगितले आहे. मात्र, विद्यापीठाने ही रक्कम महाविद्यालयांकडून घेतली नसल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. आता त्याचा भुर्दंड विद्यापीठाच्या माथी पडण्याची शक्यता आहे. याबाबत विद्यापीठ प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. 

अपील दाखल करणार

जीएसटी भरण्याच्या नोटिसीविरोधात अपील दाखल करण्याची तयारी विद्यापीठाने केली आहे. जीएसटी विभाग आणि केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे हे अपील दाखल केले जाणार आहे. 

विद्यापीठ सरकारी संस्था असल्याने त्याचा जीएसटी माफ करण्याची मागणी या अपिलात केली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 

अन्य विद्यापीठांनाही नोटीस 

राज्यातील अन्य सरकारी विद्यापीठांनाही अशा प्रकारची जीएसटी भरण्याची नोटीस आली आहे. त्यापैकी काही विद्यापीठांनी जीएसटी आयुक्तांकडे अपिल दाखल करून जीएसटी माफीची मागणी केली आहे. तसेच विद्यापीठांनी राज्य सरकारकडेही जीएसटीतून वगळण्याची मागणी केली आहे. 

याबाबत राज्यातील विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंची राज्याच्या शिक्षण मंत्र्यांकडे बैठकही झाली होती, अशी माहिती एका विद्यापीठाच्या कुलगुरूंनी दिली. तसेच राज्य सरकारही याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Pay 17 crore GST; Notice to university, tax on college affiliation fee; Students in trouble?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.