मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस पार्किंगची समस्या गंभीर होत असताना पे ॲण्ड पार्कच्या नावाखाली क्रॉफर्ड मार्केट येथील पालिकेच्या सदाफुले पे ॲण्ड पार्क चालकाकडून लूट सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’च्या ‘रिॲलिटी चेक’मधून समोर आले. त्यानंतर, ५ जानेवारी रोजी ‘सदाफुले’चे कंत्राट रद्द करत, येथील पार्किंग मोफत करण्यात आली होती. अखेर, चार महिन्यांनी या ठिकाणी पालिकेने श्रद्धा महिला बचत गटाला याचे कंत्राट दिले आहे. क्रॉफर्ड मार्केट येथे चारचाकी वाहने उभी करण्यासाठी पालिकेने ठरवून दिलेला दर हा कार मालक व चालक बघून तासाला थेट दीडशे ते तीनशे रुपयांपर्यंत जात होता. येथे दिवसाला ५०० हून अधिक वाहने उभी केली जातात. त्यातून दिवसाला ७५ हजार ते लाख रुपयांची कमाई सुरू होती. कार पार्किंगच्या नावाखाली नागरिकांची लूट आणि शासनाची कोट्यवधींची फसवणूक होत असल्याचे समोर आले. जास्तीच्या पैशांसाठी ही मंडळी पार्किंगमध्ये वाहन पार्क न करता, नो-पार्किंगमध्ये वाहने उभी करत होते. याबाबत काही चालकांना ई-चलानचाही भुर्दंड भरावा लागला. पैसे देण्यास विरोध करणाऱ्या चालकांना दमदाटीही सुरू होती. ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडताच पे ॲण्ड पार्क चालविणाऱ्या ‘सदाफुले’चे कंत्राट ५ जानेवारीपासून रद्द करण्यात आले. बचत गटाच्या नावाखाली सुरू असलेल्या पार्किंग माफियांचा चेहराही समोर आला.
पालिकेच्या दरानुसार शुल्क आकारणी -
आता बुधवारपासून तीन महिन्यांसाठी कंत्राट देण्यात आले आहे. त्यानुसार, सकाळपासून श्रद्धा महिला बचत गटाचे कर्मचारी दिसून आले. पालिकेने ठरवून दिलेल्या दरानुसार, शुल्क आकारणी सुरू होती. त्यामुळे वाहन चालकांना दिलासा मिळाला.