एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाचे अनेक प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे कोरोना विषाणूच्या संकटाचा सामना करण्यासाठी देशात शनिवारपासून लसीकरण मोहिमेलाही सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव बाहेरून येणाऱ्या लोकांना कोरोनाची मार्गदर्शक तत्वे आणि क्वारंटाईन नियमांचे पालन करणं बंधनकारक आहे. यादरम्यान, शुक्रवारी मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू असलेल्या एका रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन करण्याच्या नियमाला बगल देत त्याऐवजी वसूली करण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. पोलिसांनी याप्रकरणी एका ३५ वर्षीय सब-इंजिनिअरला आणि त्याच्या साथीदारांना अटक केली आहे. दिनेश गावंडे असं त्या सब-इंजिनिअरचं नाव आहे. त्याच्याकडे असलेल्या बॅगेतून सौदी अरेबियाच्या चलनातील भारतीय रूपयांमधील तब्बल ३५ लाख रूपयांची रोकड, २०० सौदा रियाल, होम क्वारंटाईनचे बनावट स्टॅम्प, काही लेटरहेड्स आणि काही डॉक्टरांच्या स्वाक्षऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या सब-इंजिनिअरला मुंबई महानगरपालिकेनं विमानतळावर तैनात केलं होतं. टाईम्स ऑफ इंडियानं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे. २३ डिसेंबरपासून आणि शुक्रवारी P-6 वर त्याला दुबई, कुवैत आणि अमेरिकेच्या नागरिकांची तपासणी करायची होती. दिनेश गवांडेवर तेव्हा संशय आला जेव्हा तो एका शौचालयात गेला आणि बाहेर पडताना एका हाऊसकिपिंग महिला कर्मचाऱ्याला धक्का देऊन बॅगेसह बाहेर पडला. गवांडेवर संशय आल्यानंतर सदर महिला कर्मचाऱ्यानं सीआयएसएफ आणि एमआयएएलच्या आधिकाऱ्यांना यासंदर्भातील माहिती दिली. त्यानंतर त्याला अशरफ सारंग आणि विवेक सिंह नावाच्या व्यक्तीनं विमानतळावरीलच एता दुकानातून बनावट प्रमाणपत्र तयार करण्यात मदत केल्याचा दावा तपास यंत्रणांकडून करण्यात आला. तिन्ही आरोपींना आदेशांचं उल्लंघन करणं, फसवणूक, पैसे घेणं आणि महासाथीच्या अधिनियमाअंतर्गत अटक करण्यात आली आहे. दरम्यान त्यांना १९ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात आल्याचंही पोलिसांकडून सांगण्यात आलं.
४ हजार रूपये घेऊन सोडलं
दरम्यान, पोलिसांनी यानंतर पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला. तसंच अधेरीत राहणाऱ्या शकील सलीम, मालाडमधील खान अरबाझ सत्तार, नेरळ येथे राहणार्या रियो जॉन आणि दुबई, कुवैतवरून उड्डाण करणाऱ्या प्रवाशांचे जबाब नोंदवले. क्वारंटाईन न होण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून ४ हजार रूपये घेतले जात असल्याचं यातून समोर आलं. २१ डिसेंबर रोजी इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन समोर आल्यानंतर देशभरातील विमानतळांवर तपास वाढवण्यात आला होता. तसंच युरोप, आखाती देश आणि आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांसाठी इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन अनिवार्य करण्यात आलं आहे.