लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ३० ऑगस्ट २०१८ रोजी झालेल्या द्विपक्षीय वेतन करारानुसार थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी करीत गोदी कामगारांनी केंद्रीय नौकानयन मंत्र्यांना निवेदन सादर केले. मुंबई पोर्ट ट्रस्टच्या विविध प्रकल्पांची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल हे शुक्रवारी मुंबईत दाखल झाले. यावेळी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी त्यांची भेट घेतली.
कर्मचारी संघटनेच्या शिष्टमंडळात ऑल इंडिया पोर्ट अँड डॉक वर्कर्स फेडरेशनचे (वर्कर्स) अध्यक्ष व ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये आणि ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे जनरल सेक्रेटरी व मुंबई पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त केरशी पारेख यांचा समावेश होता. त्यांनी पोर्ट भवन येथील बोर्ड रूममध्ये गोदी कामगारांच्या मागण्यांचे निवेदन मंत्र्यांना सादर केले.
थकबाकी देण्यासह विद्यमान कामगार आणि पेन्शनधारकांना मिळणाऱ्या वैद्यकीय सवलतीमध्ये सुधारणा करणे, जवाहर द्विप व पिरपाव येथील खासगीकरणाला विरोध, मुंबई बंदराचा विकास करताना गोदी कामगारांना व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना घरे देणे, कोरोनामुळे निधन झालेल्या कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देणे, कामगारांची कमतरता लक्षात घेऊन कायस्वरूपी कर्मचाऱ्यांची भरती करणे या मागण्याही करण्यात आल्या.
..........
पारितोषिक वितरण...
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त मुंबई पोर्ट ट्रस्टने आयोजित केलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. गेल्या २५ वर्षांत प्रथमच केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडल्याने कामगारांतही उत्साहाचे वातावरण होते. पोर्ट ट्रस्टच्या विजयदीप सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय बंडोपाध्याय, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.