इकडे लक्ष द्या..., ९ डिसेंबरपासून दादरला १ ते १४ फलाट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2023 01:53 PM2023-11-24T13:53:55+5:302023-11-24T13:54:03+5:30
सलग क्रमांकाची होणार अंमलबजावणी, मध्य रेल्वेवर कामांना वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावरीलदादर स्थानकात फलाट क्रमांकावरून प्रवाशांचा नेहमीच गोंधळ उडतो. ही समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने सलग फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पश्चिम रेल्वेवरील फलाट क्रमांक कायम राहणार असून, मध्य रेल्वेवरील पहिल्या फलाटाला आठ क्रमांक देण्यात येणार आहे. यामुळे मध्य रेल्वेवर ८ ते १४ क्रमांकाचे फलाट राहणार असून, त्याची अंमलबजावणी ९ डिसेंबरपासून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कामांना गती दिली आहे.
दादर म्हणजे मुंबईतील मध्यवर्ती आणि सर्वांत गर्दीचे रेल्वेस्थानक मात्र पश्चिम आणि मध्य रेल्वेचे फलाट गाठताना प्रवाशांमध्ये कायम गोंधळ उडतो. दोन्हीकडील फलाट क्रमांक एकने सुरू होत असल्याने प्रवाशांचा उडणारा गोंधळ लक्षात घेऊन दादर स्थानकात सलग १ ते १५ फलाट क्रमांक देण्याचा निर्णय घेतला होता. दादर स्थानकावर पश्चिम रेल्वेच्या पहिल्या फलाटापासून सुरू झालेला क्रम मध्य रेल्वेच्या शेवटच्या फलाटापर्यंत कायम राहणार आहे. त्यानुसार मध्य रेल्वेचे एक ते आठ क्रमांकाचे फलाट इतिहासजमा होतील.
प्रवाशांचा गोंधळ टाळण्यासाठी दादर रेल्वेस्थानकात सलग फलाट क्रमांक केले जात असून, ९ डिसेंबर अंमलबजावणी होणार आहे. त्यादृष्टीने मध्य रेल्वेने तयारी सुरू केली आहे. साइन बोर्ड, घोषणांची पूर्वतयारी करणे, डबा सूचना फलक बदलणे आदी तयारी सुरू आहे.
- डॉ. शिवराज मानसपुरे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे