Join us

महापालिका शाळांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या, सीसीटीव्ही बसवा : शिक्षण समितीत सदस्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:12 AM

मुंबईसह देशात सध्या शाळांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा रंगली आहे. सुरक्षा यंत्रणा शाळांमध्ये अस्तित्वात नसल्याने अनेक पालक तणावाखाली आहेत.

मुंबई : मुंबईसह देशात सध्या शाळांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर चर्चा रंगली आहे. सुरक्षा यंत्रणा शाळांमध्ये अस्तित्वात नसल्याने अनेक पालक तणावाखाली आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या शाळा हायटेक करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने विचार होत नसल्याचे दिसून आले. महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्याने सोमवारी झालेल्या शिक्षण समितीच्या बैठकीत या विषयावर जोरदार चर्चा रंगली. महापालिकांच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्याची मागणी सदस्यांकडून झाली. तसेच, सुरक्षारक्षकांची पोलिसांकडून पडताळणी व्हावी अशीही मागणी करण्यात आली.गुरुग्राम येथील रायन इंटरनॅशनल शाळेत झालेल्या विद्यार्थ्याच्या हत्येनंतर देशभरात भीतीचे वातावरण पसरले होते. पालक विश्वासाने मुलांना शाळांमध्ये सोडतात. पण, इथे विद्यार्थी सुरक्षित आहेत की नाही, याविषयी प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले. महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत पाठवताना पालक तणावात असतात. हे लक्षात घेऊन महापालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवावेत, असे मत शिक्षण समिती सदस्य साईनाथ दुर्गे यांनी व्यक्त केले.मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे ४१७ शाळा चालविण्यात येतात. त्यात २२७ शाळा या भाडेतत्त्वावरील इमारतींत भरवल्या जातात. तसेच मालमत्ता विभागाच्या ३३ शाळा आहेत. तर बिगर भाडेतत्त्वावर २४ अशा एकूण ७०१ शाळांच्या इमारती पालिकेच्या अखत्यारीत येत आहेत. यात जवळपास ३ लाख ४६ हजार ७४२ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यातील जवळपास सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली. त्यामुळे या सर्वच शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची मागणी दुर्गे यांनी केली. दुर्गे यांच्या मागणीला इतर जवळपास सर्वच सदस्यांनी पाठिंबा दर्शविला असून, विद्यार्थी सुरक्षेसाठी सीसीटीव्ही महत्त्वाचे असल्याची बाब या वेळी इतर सदस्यांकडून उपस्थित करण्यात आली.महापालिका शाळांमध्ये सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे. या शाळांमध्ये सुरक्षारक्षक आणि सफाई कर्मचाºयांची नेमणूक ही कंत्राट पद्धतीने होते. त्यामुळे या व्यक्तींची पोलिसांकडून पडताळणी होणे आवश्यक असल्याचीही मागणी करण्यात आली. तसेच सीसीटीव्हीची आवश्यकता असल्याचे मत सर्वच सदस्यांनी व्यक्त केले. या वेळी प्रशासनाने सकारात्मक उत्तर दिले आहे. पण, प्रत्यक्षात अंमलबजावणी कधी आणि कशी होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :शाळामुंबई