मुंबई : राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीच्या अनुषंगाने विविध उपाययोजना सरकारकडून राबविल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर उन्हाळी सुट्टयानंतर शाळा सुरु होताना शाळांमध्ये पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारकडून शिक्षण आयुक्त आणि शिक्षण संचालकांना देण्यात आल्या आहेत. विशेषत: शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील याची काळजी घ्यावी, असे निर्देश प्राधान्याने देण्यात आले आहेत.उन्हाळी सुट्टयानंतर शाळा सुरु होताना शाळांमध्ये वापरासाठीच्या तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई होणार नाही या दृष्टीने तातडीने आढावा घेण्याबाबत प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना स्पष्ट सूचना देण्यात याव्यात, असे निर्देश सरकारकडून शिक्षण आयुक्त आणि संचालकांना पत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. सध्या सरकार दुष्काळसदृश आणि दुष्काळग्रस्त भागात विविध उपाययोजना राबवित असल्याने शाळाही तितक्याच महत्त्वाच्या असल्याने हे निर्देश देण्यात आले आहेत. दुष्काळग्रस्त भागात पाणीटंचाई असलेल्या असलेल्या ठिकाणच्या शाळांमध्ये आवश्यकते इतक्या पाण्याची विशेषत: पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राहील यादृष्टीने उपाययोजना करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यास प्राधान्य द्यावे असे निर्देशही देण्यात आले आहेत.या उपाययोजनांसंदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी शिक्षणाधिकारी यांना आवश्यक ते मार्गदर्शन आणि मदत उपलब्ध करून द्यावयाची आहे.
शाळांतील पाण्याच्या व्यवस्थेकडे लक्ष द्या; शिक्षण संयुक्त व संचालकांना सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:49 AM