बिल भरा; नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम अजून तीव्र होणार : महावितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:06 AM2021-07-02T04:06:25+5:302021-07-02T04:06:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोनाच्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला आहे. मात्र, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या काळात महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जिवाची पर्वा न करता ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा केला आहे. मात्र, अनेक ग्राहकांनी लॉकडाऊनच्या काळातील वीजबिलाचा भरणा अजूनही केला नाही. परिणामी भांडूप परिमंडळातील ग्राहकांच्या वीजबिलाची थकबाकी वाढतच असून, वीजबिल न भरल्यामुळे १८ जूनपासून सर्व वर्गवारीतील अनेक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू झाली आहे. आता बिल भरा, नाही तर वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम पुढे अजून तीव्र होणार आहे, असेही महावितरणे म्हटले आहे.
ग्राहकांच्या सोयीसाठी सध्या सुट्टीच्या दिवशीही सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र सुरू आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, ग्राहक डिजिटल माध्यमाचा वापर करूनही घरबसल्या आपले वीजबिल www.mahadiscom.in किंवा महावितरणच्या मोबाइल ॲपद्वारे भरू शकतात. कुठल्याही परिस्थितीत अधिकारी व कर्मचारी अखंडित वीजपुरवठा देण्यासाठी तयार असतात. मात्र, वीजबिलाची वसुलीसाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागत आहे. आर्थिक स्थिती लक्षात घेता वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा नाइलाजाने खंडित करावा लागत आहे, असे महावितरणकडून सांगण्यात आले. ही मोहीम पुढे अजून तीव्र होणार आहे. अशी करवाई टाळण्यासाठी ग्राहकांनी आपले वीजबिल भरून महावितरणला सहकार्य करावे.
भांडूप विभागातील २८६९ ग्राहक, मुलुंड विभागातील २७१५, ठाणे- १ येथील २००८, ठाणे- २ विभागातील १९३८, तर वागळे इस्टेट येथील ३४३८ ग्राहकांचा वीजपुरवठा तात्पुरता खंडित करण्यात आला आहे. नेरूळ विभागातील २६१४ ग्राहकांचा तर पनवेल शहर विभागातील ५३७६ व वाशी विभागातील ३३०८ ग्राहकांचा वीजपुरवठा थकीत वीजबिलामुळे खंडित केला आहे. अलिबाग येथे २०३२, गोरेगाव विभाग- २५१५, पनवेल ग्रामीण विभाग २९०९, रोहा विभागातील- २५२५ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.