क्रेडिट कार्डाची बिले भरा तीन महिन्यांनंतर; रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केली संपूर्ण नियमावली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2020 01:59 AM2020-03-31T01:59:14+5:302020-03-31T06:33:59+5:30
भारतीय रिझर्व्ह बॅँकेने याआधी घोषणा केलेल्या अधिस्थगनाची संपूर्ण नियमावली सोमवारी जाहीर केली. त्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या अधिस्थगन(मोरॅटोरिअम) मुळे कर्जधारकांना कर्जाचे हप्ते भरण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे क्रेडिट कार्डवरील असलेली देय रक्कम आणि व्याज भरण्यासाठीही तीन महिन्यांची मुदत मिळणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅँकेने याआधी घोषणा केलेल्या अधिस्थगनाची संपूर्ण नियमावली सोमवारी जाहीर केली. त्यामध्ये हे स्पष्ट करण्यात आले आहे.
रिझर्व्ह बॅँकेने जाहीर केलेल्या सूचनांमध्ये १ मार्च ते ३१ मे दरम्यान देय असलेले कर्जाचे हप्ते, कर्जावरील व्याज, मुद्दल तसेच क्रेडीट कार्डावरील देय रक्कम यांना तीन महिन्यांची मुदतवाढ संबंधित संस्था देऊ शकतील. कॅश क्रेडीट आणि ओव्हर ड्राफ्टच्या स्वरुपामध्ये देण्यात आलेल्या खेळत्या भांडवलाचाही यामध्ये समावेश असणार आहे.
ज्या कालावधीमध्ये ही सवलत दिली जाणार आहे, त्या कालावधीचे व्याज तातडीने मुदत संपल्यावर भरावे लागणार असल्याचे रिझर्व्ह बॅँकेच्या सूचनेमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. याचात अर्थ ही कर्जमाफी नसून केवळ काही काळ कर्जाची वसुली पुढे ढकलली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कर्जदारांना पैसे जमविण्यासाठी तीन महिन्याच्या अतिरिक्त कालावधी मिळणार आहे. लॉकडाउनमुळे अनेकांना घराबाहेर पडणे शक्य होत नसल्याने तसेच उत्पन्नाचा स्त्रोत आटल्यामुळे अनेकांना आपल्या कर्जाचे देय हप्ते कसे भरावे हा प्रश्न पडला होता. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बॅँकेने मोरॅटोरिअमचा निर्णय जाहीर केला आहे. उत्तरप्रदेशच्या गौतमनगर येथील जिल्हाधिकाऱ्यांनी जसा आदेश तेथील घरमालकांसाठी काढला आहे, तसा आदेश देशाच्या अन्य भागामधील अधिकाऱ्यांनी काढून भाडे देणे अशक्य असणाºया गरीबांना दिलासा द्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
भाडेकरूंनांही मिळणार दिलासा
उत्तर प्रदेशच्या गौतम बुद्धनगर येथील जिल्ह्यधिकाºयांनी भाडे थकविल्यामुळे कोणाही घरमालकाने आपल्या भाडेकरूला घराबाहेर काढू नये असे आदेश काढले आहेत. कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधासाठी देशामध्ये लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर अनेक कामगारांना काम मिळत नाही. त्यामुळे त्यांचे उत्पन्न थांबले आहे. सध्याच्यां स्थितीमध्ये घरमालकांनी आपल्या भाडेकरूंकडे भाड्याची मागणी करू नये तसेच भाडे थकल्यामुळे त्यांना घराबाहेर काढू नये, असेही जिल्हाधिकारी बी. एन. सिंग यांनी स्पष्ट केले आहे. जिल्ह्यातील सर्व घरमालकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.