पेन्शन खाते उघडण्यासाठी बँकेकडून तारीख पे तारीख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:06 AM2021-07-16T04:06:31+5:302021-07-16T04:06:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : पेन्शन खाते उघडण्यासाठी बँकेकडून ग्राहकांना ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. गोरेगाव पूर्व येथील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पेन्शन खाते उघडण्यासाठी बँकेकडून ग्राहकांना ‘तारीख पे तारीख’ दिली जात आहे. गोरेगाव पूर्व येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हा प्रकार घडत असल्याचे ग्राहकांकडून सांगण्यात आले.
गोरेगाव पूर्व येथे स्टेट बँक ऑफ इंडियाची गोकुळधाम शाखा आहे. पेन्शन खाते उघडण्यासाठी काही ग्राहक याठिकाणी गेल्या काही दिवसांपासून हेलपाटे घालत आहेत. मात्र त्यांना सतत ‘पुढच्या आठवड्यात या’ किंवा ‘मॅनेजरला भेटा’ अशी उत्तरं बँक कर्मचाऱ्यांकडून दिली जात आहेत. गोकुळधाममध्ये राहणाऱ्या आणि केईएम रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या महिलेच्या निवृत्तीची तारीख जवळ असल्याने त्यांना रुग्णालय व्यवस्थापनाकडे पेन्शनसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करायची आहेत. ज्यात त्यांना सरकारी बँकेचा खाते क्रमांकही देणे गरजेचे आहे. त्यामुळे गेल्या तीन आठवड्यापासून त्या बँकेत हेलपाटे घालत आहेत. मात्र त्यांना काहीना काही कारण सांगत कर्मचाऱ्यांकडून परत पाठविले जात असल्याचे त्यांनी सांगितले. बँकेची ही शाखा मला जवळ असल्याने पुढे पेन्शन आणायला सोयीचे पडेल म्हणून येथे खाते उघडण्याचा माझा आग्रह आहे. याउलट अन्य बँका मला तीन दिवसांत खाते उघडून देण्यास तयार आहेत. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्याचे हे वागणे त्रासदायक आणि वेळखाऊ आहे, असेही त्या म्हणाल्या.
सर्व्हिस मॅनेजर सुट्टीवर
आमच्याकडे सध्या मनुष्यबळाचा अभाव आहे. त्यातच आमच्या सर्व्हिस मॅनेजरही सुट्टीवर आहेत. मात्र पेन्शन खात्यासाठी आम्ही नेहमीच प्राधान्य देतो. त्यामुळे ज्यांना खाते उघडायचे आहे त्यांनी येऊन मला भेटावे.
- ब्रँच हेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, गोकुळधाम शाखा