लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सेवानिवृत्तांची व मृत कर्मचाऱ्यांची अंतिम देयके सन २०१८ सालापासून प्रलंबित आहेत. रजेचे वेतन व कराराचा फरक अद्यापीही त्यांना दिलेला नाही. जवळ पैसे नसल्याने सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. सेवानिवृत्तांची देणी तातडीने द्या, अन्यथा संघटना आंदोलन करणार, असा इशारा महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने दिला आहे.
महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे म्हणाले की, ज्या महामंडळाची तीस- पस्तीस वर्षे सेवा केली, ज्या लालपरीसाठी घाम गाळला, त्या लालपरीच्या सेवकांना औषध पाण्यासाठीही पैसे नाहीत, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. त्यांची देणी तातडीने व एकरकमी देण्यात यावीत यासाठी २१ जून २०२१ रोजी संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे व अध्यक्ष संदीप शिंदे यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखरजी चन्ने तसेच महामंडळाचे वित्तीय सल्लागार तथा मुख्य लेखाधिकारी मंदार पोहोरे यांची भेट घेऊन सेवानिवृत्तांच्या व्यथा मांडल्या. यापूर्वीच राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, परिवहनमंत्री यांच्याशी संघटनेने पत्रव्यवहार केला आहे. एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनीही रक्कम देण्याबाबत अनुकूल मत व्यक्त केले असून विद्यमान कर्मचाऱ्यांच्या एकतर्फी वेतनवाढीतील उर्वरित रक्कम द्यावी, प्रलंबित महागाई भत्ता, घरभाडे भत्ता, वेतनवाढीचा दर व सेवानिवृत्तांची देणी तातडीने देण्यात यावी अन्यथा संघटनेच्या ४ जुलै रोजी होणाऱ्या मध्यवर्ती कार्यकारिणीत आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, असे ते म्हणाले.
..................................