इशारा
वाहतूक नियम उल्लंघन करणाऱ्यांची यादी तयार
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबईच्या वाहतूक पोलिसांनी बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्यांची यादी तयार केली आहे. या यादीनंतर मुंबई वाहतूक पोलिसांनी आता या ‘रॅश’ वाहनचालकांकडून ई-चलानसाठी दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. थकीत ईचलनवर दंड भरा अन्यथा वाहन परवाना रद्द होईल, असा इशारा वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
सहपोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी म्हटले की, आम्ही आमच्या नियंत्रण कक्षातून ई-चलान असलेल्या ५० हजार वाहनचालकांशी संपर्क साधणार आहोत. या वाहनांच्या मालकांनी त्यांच्या ई-चलानवर दंड भरला नाही, तर अशा वाहनचालकांचे परवाने रद्द केले जातील.
मुंबईतील मारुती एर्टिगा आणि ह्युंदाई व कारमध्ये ई-चलानची संख्या सर्वाधिक आहे. मारुती एर्टिगावर १५० ई-चलान आणि १ लाख ५२ हजारांचा दंड आहे तर ह्युंदाई कारवर ११० ई-चलान आणि एक लाख १० हजारांचा दंड या वाहनांच्या मालकांच्या नावाने वसूल करण्यात आला आहे. मुंबईतील वांद्रे-वरळी सी-लिंकवरील बेफिकीर वाहनचालक पोलिसांच्या रडारवर आहेत. याशिवाय रिक्षाचालकांच्या नावाने ७० ते १५० ई-चलान जारी करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्थानावर मालाडच्या होंडा सिटी कारचा मालक आहे. ८० हजारांचे चलन या व्यक्तीच्या नावावर आहे. त्यानंतर कांदिवलीतील रेनॉल्ट डस्टर आणि होंडा जॅझ यांच्या मालकांना अनुक्रमे ७२ हजार आणि ७१ हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्तीतजास्त दंड भरधाव वेगात वाहन चालविण्यासाठी आहे. त्या तुलनेत नो-पार्किंग झोन आणि लेन कटिंगमध्ये बेकायदा कार पार्किंग किंवा पार्किंगची प्रकरणे तुलनेने कमी आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांना दंड वसूल करणे कठीण जाईल, असे वाहतूक पोलिसांनी सांगितले. काही प्रकरणांप्रमाणेच आरटीओचा दंड त्यांच्या वाहनाच्या किमतीइतकाच आहे. अनेकदा एका वाहन मालकाकडून दुसऱ्या वाहन मालकास गाड्या विकल्या जातात. तथापि, अशी काही प्रकरणे आहेत जिथे मालक स्वत:चे वाहन चालवत नाही.