साडेचार लाख रुपयांची भरपाई द्या!
By admin | Published: July 10, 2016 04:07 AM2016-07-10T04:07:50+5:302016-07-10T04:07:50+5:30
भरजरी वस्त्रे व भेटवस्तूने भरलेली बॅग हलगर्जीपणामुळे हरवल्याने इंडिगोला चांगलाच फटका बसला आहे. या बॅगेची भरपाई म्हणून अतिरिक्त मुंबई उपनगर ग्राहक तक्रार निवारण मंचाने
- दीप्ती देशमुख, मुंबई
भरजरी वस्त्रे व भेटवस्तूने भरलेली बॅग हलगर्जीपणामुळे हरवल्याने इंडिगोला चांगलाच फटका बसला आहे. या बॅगेची भरपाई म्हणून अतिरिक्त मुंबई उपनगर ग्राहक तक्रार निवारण मंचाने इंडिगोला ४ लाख २३ हजार १०० रुपये तक्रारदाराला देण्याचा आदेश दिला आहे. इंडिगोने सेवा सुविधेत कसूर केल्याचे निरीक्षण ग्राहक मंचाने नोंदवले आहे.
वैभव कर्नावट व कल्पेथा कर्नावट या दाम्पत्याने मे. इंटरग्लोब एव्हीएशन लि. (इंडिगो) प्रवासादरम्यान त्यांची भरजरी वस्त्रे व मौल्यवान भेटवस्तूंनी भरलेली बॅग विमान सामान कक्षातून हरविल्याची तक्रार २०१२मध्ये ग्राहक मंचाकडे केली होती.
प्रवासादरम्यान ही बॅग विमानाच्या सामान कक्षात ठेवण्यात आली. जयपूरला उतरल्यानंतर कर्नावट दाम्पत्याला त्यांची बॅग मिळेना. यासंदर्भात त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. तरीही त्यांची बॅग मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी तक्रारीचा पाठपुरावाही केला, मात्र बॅग परत मिळाली नाही.
बॅग हरविल्याने कल्पिथा यांना
आवडीने विवाह समारंभात सहभागी होता आले नाही; तसेच विवाहात नातेवाइकांसाठी आणलेल्या भेटवस्तू देता आल्या नाहीत. त्यामुळे कर्नावट दाम्पत्याला मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे इंडिगोला मानसिक त्रास दिल्याबद्दल एक लाख रुपये नुकसानभरपाई आणि बॅगेतील वस्तूंची भरपाई म्हणून ३ लाख २३ हजार १०० रुपये देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी तक्रारदाराने अर्जात केली आहे.
तक्रारदार हिऱ्याचे व्यापारी असल्याने त्यांनी दावा केल्याप्रमाणे त्यांच्याकडे भरजरी वस्त्रे आणि महागड्या भेटवस्तू असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच त्यांनी यासंदर्भातील तपशीलवार माहिती सादर केली आहे. इंडिगोने सुविधा सेवेत कसूर केला आहे, असे स्पष्ट करत ग्राहक मंचाने इंडिगोला बॅगेतील वस्तू हरवल्याने ३ लाख २३ हजार १०० रुपये तर मानसिक त्रासापायी एक लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले. (प्रतिनिधी)
भेटवस्तूंनी भरलेली बॅग
- कर्नावट दाम्पत्याला जवळच्या नातेवाइकांच्या विवाह समारंभासाठी जायचे असल्याने मुंबई ते जयपूर या प्रवासासाठी इंडिगोची तिकिटे बुक केली.
- प्रवास करताना त्यांच्याकडे भरजरी वस्त्रे आणि नातेवाइकांना देण्यासाठी घेतलेल्या भेटवस्तूंची भरलेली बॅग होती. या बॅगेमध्ये
३ लाख २३ हजार १०० किमतीची वस्त्रे आणि भेटवस्तू होत्या.