वीज ग्राहक संघटनेची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या वर्षी औद्योगिक ग्राहकांना थकबाकी भरण्यासाठी महावितरणने हप्ते धोरण जाहीर केले होते. या वर्षी एप्रिलपासून लॉकडाऊन सुरू असूनही अद्यापही हप्ते धोरण नाही. उलट वीजपुरवठा खंडित करण्यात येईल, अशा नोटिसा दिल्या जात आहेत. मात्र, काेराेनाकाळ लक्षात घेता थकबाकीसाठी हप्ते द्या, वीजपुरवठा खंडित करू नका, अशी मागणी वीज ग्राहक संघटनेने केली आहे.
कोरोनामुळे उद्योग कोंडीत सापडले आहेत, ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सरकारने महावितरण कंपनीमार्फत त्वरित हप्ते धोरण लागू करावे. थकबाकी रकमेसाठी डाउन पेमेंट १० टक्के करावे. उर्वरित रकमेसाठी १२ समान मासिक हप्ते द्यावेत. गतवर्षीच्या अर्जदार ग्राहकांचा योजनेत समावेश करावा, अशा मागण्या विविध औद्योगिक संघटनांच्या वतीने सरकारकडे करण्यात आल्या आहेत. महावितरणने कृषिपंप वगळता अन्य सर्व प्रकारच्या वीजग्राहकांसाठी इन्स्टॉलमेंट पॉलिसी परिपत्रक जाहीर केले होते. ३१ मार्च २०२१ नंतर ही हप्ते योजना बंद आहे, असे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी सांगितले.
............................