राष्ट्रीयीकृत बँकेतूनच पगार द्या!
By admin | Published: June 21, 2017 04:02 AM2017-06-21T04:02:30+5:302017-06-21T04:02:30+5:30
मुंबै जिल्हा बँकेतून शिक्षकांच्या पगार देण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने विरोध केला आहे. शिक्षण विभागासोबत मुंबै जिल्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबै जिल्हा बँकेतून शिक्षकांच्या पगार देण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाला महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेने विरोध केला आहे. शिक्षण विभागासोबत मुंबै जिल्हा बँकेविरोधात शिक्षक सेनेने मंगळवारी आझाद मैदानात निदर्शनेही केली.
जिल्हा बँकेतून पगार देण्याचा निर्णय रद्द करून सरकारने शिक्षकांचे पगार राष्ट्रीयीकृत बँकेतूनच द्यावेत, अशी मागणी शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी केली. कायंदे म्हणाल्या की, याआधीही मुंबै बँकेतून शिक्षकांना वेतन दिले जात होते. मात्र, बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर आणि सातत्याने उशिराने होणाऱ्या पगारामुळे २०११ सालानंतर वेतन वितरणाचे काम युनियन बँक आॅफ इंडिया या राष्ट्रीयीकृत बँकेकडे सोपविले होते. मात्र, केवळ राजकीय हितसंबंध जोपासण्यासाठी शासनाने हा उफराटा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम २७ हजार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर होणार आहे.
शिक्षकांच्या पगारास दिरंगाई होण्याची भीती शिक्षक सेनेने व्यक्त केली आहे. गृहकर्ज, विमा योजना आणि विविध हफ्त्यांना उशीर झाल्यास, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नाहक भुर्दंडाला सामोरे जावे लागते. त्यामुळे शासनाने हा निर्णय रद्द करून, कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेतून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार वितरण करावे, अशी मागणी केली आहे.