मुंबई : ‘पैसे दे नाहीतर तुला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवेन’, अशी धमकी टी- सीरिज कंपनीचा व्यवस्थापक भूषणकुमार याला देण्यात आल्याचा आरोप त्याचे काका निर्माते तसेच टी- सीरिज सुपर कॅसेट प्रायव्हेट लिमिटेडचे मालक किशनकुमार चंद्रभान अरोरा (५६) यांनी शुक्रवारी अंबोली पोलिसांत लेखी तक्रार करीत केला होता. यात त्यांनी पुतण्यावर बलात्काराचा आरोप करणाऱ्या मॉडेलचा मित्र आणि ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता मल्लिकार्जुन पुजारी याने हा प्रकार केल्याचे म्हटले असून त्यानुसार शनिवारी अंबोली पोलिसांनी याप्रकरणी पुजारी विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
भूषणकुमारकडे जून,२०२१ मध्ये पुजारी याने खंडणीची मागणी केली होती. मात्र, त्याला भूषणने थेट नकार दिला. तेव्हा पैसे दे नाहीतर तुला बलात्काराच्या खोट्या आरोपात अडकवेन आणि तुला जीवे मारेन अशा आशयाची धमकी त्याने पुतण्याला दिल्याचे किशनकुमार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. याप्रकरणी त्यांनी १ जुलै, २०२१ रोजी अंबोली पोलिसांत लेखी तक्रार दिली होती.
किशनकुमार यांनी पुजारीला फोन करीत त्याच्याशी बोलणे केले. तेव्हा त्याने अंधेरीच्या ‘हॉटेल रिगेन्झा बाय तुंगा’ याठिकाणी भूषणला ५ जुलै, २०२१ रोजी दुपारी १ वाजता भेटायला बोलावले होते. त्यानुसार पुजारी आणि भूषणची भेट झाली. तेव्हा पैसे नाही दिलेस तर एका मुलीला पुढे करून तुला बलात्काराच्या आरोपात अडकवेन, असे सांगत त्याला काही आक्षेपार्ह व्हॉटसॲप मेसेज दाखविण्यात आले. जे भूषण किंवा टी- सीरिजच्या कोणत्याही व्यक्तीच्या मोबाइलमधून पाठविण्यात आले नव्हते. मात्र, याचाच वापर करत भूषणला फसविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, भूषणने त्याला सरळ नकार दिला आणि तिथून परतला. पुजारीसोबत भूषणचे फोनवरील संभाषणाचे रेकॉर्डिंग अंबोली पोलिसांना देण्यात आले आहे.
किशनकुमार यांच्या तक्रार अर्जानुसार आम्ही मल्लिकार्जुन पुजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
- सोमेश्वर कामथे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबोली पोलीस ठाणे.