मुंबई : बांधकामादरम्यान उंच इमारतीच्या सातव्या मजल्यावरून खाली पडून मजुराचा मृत्यू झाल्याने त्याच्या आईला २० लाख रुपयांची नुकसानभरपाई द्या, असे आदेश कामगार न्यायालयाने रिअल इस्टेट फर्मला दिले आहेत. अपघाती मृत्यू झालेल्या मजुराचे नाव दरोगा चौहान असे आहे.
मूळचा बिहार येथील असलेल्या दरोगाचा ११ नोव्हेंबर २०१६ रोजी इमारतीवरून पडून मृत्यू झाला. दरोगा चौहान मेसर्स रामेश्वर इन्फ्रा पार्टनर्ससाठी काम करत होता. मुलाचा मृत्यू निष्काळजीपणामुळे झाल्याचा दावा करत चौहानच्या आईने कामगार न्यायालयात धाव घेतली.
बांधकामाच्या ठिकाणी पुरेशी खबरदारी घेतली न गेल्याने चौहानच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल दोन कंत्राटदारांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला, असे न्यायालयाने निकालात नमूद केले आहे. तत्काळ सहाय्य न केल्याने न्यायालयाने रिअल इस्टेट फर्मला सात लाखांचा दंडही ठोठावला. नुकसानभरपाईच्या रकमेतच दंडाच्या रकमेचा समावेश आहे.